वृत्तसंस्था/ बिजिंग
शुक्रवारपासून चीनमध्ये हिंवाळी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत सहभागी होणाऱया युक्रेनच्या संघाचे स्पर्धा आयोजकातर्फे जोरदार स्वागत करण्यात आले. दरम्यान रशिया-युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे रशिया आणि बेलारूसच्या ऍथलिट्सना स्पर्धा आयोजकांनी परत पाठविले आहे.
बिजिंगमधील बर्डस् नेस्ट स्टेडियममध्ये हिवाळी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मोठय़ा जल्लोषात झाला. या उद्घाटन समारंभाला आंतरराष्ट्रीय पॅरा आलिम्पिक समितीचे अध्यक्ष पार्सन्स तसेच चीनचे अध्यक्ष जिनपिंग हे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये विविध देशांचे सुमारे 564 ऍथलिट्स 78 क्रीडाप्रकारातील पदकांसाठी लढत देतील. ही स्पर्धा 13 मार्चला संपणार आहे.
पाकिस्तानचा पहिल्या डावात 476 धावांचा डोंगर
रावळपिंडी कसोटी, दुसरा दिवस ः इमाम उल हक 157, अझहर अली 185, ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निष्प्रभ
रावळपिंडी
येथे सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी खेळाच्या दुसऱया दिवशी यजमान पाकने आपला पहिला डाव 4 बाद 476 धावांवर घोषित केला असून ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात बिनबाद 5 धावा जमविल्या. पाकतर्फे इमाम उल हक आणि अझहर अली यांनी शानदार शतके झळकविली. अझहर अलीने 185 तर इमाम उल हकने 157 धावा जमविल्या.
पाकने 1 बाद 245 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. संघाची धावसंख्या 313 झाली असताना ऑस्ट्रेलियाच्या कमिन्सने पाकची ही जोडी फोडली. कमिन्सच्या गोलंदाजीवर इमाम उल हक पायचीत झाला. त्याने 358 चेंडूत 2 षटकार आणि 16 चौकारांसह 157 धावा झळकविताना दुसऱया गडय़ासाठी अझहर अलीसमवेत 208 धावांची भागिदारी केली. 64 धावांवर खेळत असलेल्या अझहर अलीने लियॉनच्या गोलंदाजीवर मिडॉनच्या दिशेने चौकार ठोकून आपले हे शतक 257 चेंडूत चहापानानंतर झळकविले.
अझहर अली आणि कर्णधार बाबर आझम यांनी खेळाच्या दुसऱया सत्रात 92 धावांची भागिदारी केली. शतक पूर्ण झाल्यानंतर अझहर अलीने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान तसेच फिरकी गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. त्याने आपले दीडशतक 317 चेंडूत दोन षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने झळकविले. दरम्यान कर्णधार बाबर आझम चोरटी धाव घेण्याच्या नादात धावचीत झाला. त्याने 82 चेंडूत 3 चौकारांसह 36 धावा जमविल्या.
लाबुसिंघेने अझहर अलीला ग्रीनकरवी झेलबाद केले. त्याने 361 चेंडूत 3 षटकार आणि 15 चौकारांसह 185 धावा झळकविल्या. मोहम्मद रिझवान तीन चौकारांसह 29 धावांवर तर इफ्तिकार अहमद 1 चौकारांसह 13 धावांवर नाबाद राहिले. पाकने 162 षटकांत 4 बाद 476 धावांवर डावाची घोषणा केली. ऑस्ट्रेलियातर्फे लेयॉन, कमिन्स आणि लाबुसिंघे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर पहिल्या डावात 1 षटकांत बिनबाद 5 धावा जमविल्या. उस्मान ख्वाँजा 5 धावांवर खेळत असून वॉर्नरने खाते उघडलेले नाही. तब्बल 24 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. अंधूक प्रकाशामुळे निर्धारित षटकांपैकी 15 षटके बाकी असताना पंचांनी खेळ थांबविला.
संक्षिप्त धावफलक
पाक प. डाव – 162 षटकांत 4 बाद 476 डाव घोषित (अझहर अली 185, इमाम उल हक 157, अब्दुल शफीक 44, बाबर आझम 36, मोहम्मद रिझवान नाबाद 29, इफ्तिकार अहमद नाबाद 13, लियॉन 1-161, कमिन्स 1-62, लाबुसिंघे 1-53), ऑस्ट्रेलिया प. डाव बिन बाद 5 (उस्मान ख्वाँजा खेळत आहे 5, वॉर्नर खेळत आहे. 0).