सेन्सेक्समध्ये 383 अंकांची घसरण, टाटा स्टील नुकसानीत
वृतसंस्था/ मुंबई
शेअर बाजारामध्ये मंगळवारी दुसऱया दिवशीही युक्रेन रशिया यांच्यातील तणावाचा परिणाम दिसून आला. सकाळी शेअर बाजार मोठय़ा प्रमाणात घसरलेला होता. सरतेशेवटी बाजार सावरत घसरणीसह बंद झाला. टाटा स्टील आणि टीसीएसचे समभाग सर्वाधिक नुकसानीत राहिले.
मंगळवारी सरतेशेवटी मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 383 अंकांच्या घसरणीसह 57300.68 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 114 अंकांच्या घसरणीसह 17092.20 अंकांवर बंद झाला. निफ्टीतील 16 कंपन्यांचे समभाग तेजीसह तर 34 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. महिंद्रा आणि महिंद्रा, आयशर मोटर्स, हिंडाल्को, बजाज फिनसर्व्ह, हिरोमोटो, ओएनजीसी, कोटक बँक, एचडीएफसी आणि सिप्ला यांचे समभाग तेजीसह बंद झाले. तर बीपीसीएल, टीसीएस, टाटा स्टील, टाटा मोटर्स, एसबीआय लाईफ, एसबीआय, डॉ. रेड्डीज लॅब्स, भारती एअरटेल यांचे समभाग 4 टक्क्यांपर्यंत घसरले होते. बीएसईवर मीडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांक अडीच टक्क्यांपर्यंत घसरल्याचे दिसून आले. सकाळी रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनमधील दोन नव्या देशांची घोषणा केल्यामुळे बाजारावर सुरुवातीच्या सत्रामध्ये मोठी घसरण अनुभवायला मिळाली.
गुंतवणूकदारांचे 2.50 लाख कोटी बुडाले
सेन्सेक्समध्ये लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल 254.76 लाख कोटी रुपये राहिले होते. सोमवारी 252.27 लाख कोटी रुपये राहिले होते. गुंतवणूकदारांचे 2.50 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. 30 पैकी 10 समभाग तेजीसह तर 20 समभाग घसरणीसह बंद झाले. सकाळी सेन्सेक्स 56438 अंकांवर खुला झाला होता.
युक्रेन परिस्थितीचा परिणाम विदेशातील बाजारातही दिसला. जपानचा निक्केई दोन टक्के तर हाँगकाँगचा हँगसेंग 3 टक्क्यांनी घसरलेला होता. कोरियाचा कोस्पी एक टक्के तर शांघाई कंपोझीट मध्ये एक टक्के घसरण होती.