पुणे / प्रतिनिधी :
युनिक इंग्लिश मीडियम स्कूल ( कात्रज- कोंढवा रोड ;गोकुळ नगर) चे वार्षिक स्नेहसंमेलन गणेश कला क्रीडा मंच येथे उत्साहात पार पडले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी सर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन साई हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ सुनील जगताप यांनी केले. कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्यक आयुक्त अनिल गुंजाळ प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनिल गुंजाळ म्हणाले, भविष्य उज्ज्वल करायचं असेल तर ज्या क्षेत्राची आवड असेल त्या क्षेत्राची निवड करावी, कोणतेही कार्य करताना श्रद्धा जरूर असावी परंतु अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये, तसेच यशस्वी झाला नाहीत तर निराश न होता पुन्हा प्रयत्न करत राहून यश संपादन करावे.
तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांचीही आवश्यकता असते. वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. आर. ए. मुलाणी व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला .
विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्याविष्कारतून महाराष्ट्राची लोकधारा, शिवचरित्र, कोळीगीत, शिवतांडव, वारकऱ्यांची विठ्ठलभक्ती, निसर्गाचे संवर्धन यांचे सादरीकरण करीत उपस्थितांची दाद मिळवली. तसेच गांधी एक यात्रा, प्रदूषणाचे दुष्परिणाम, सम्राट अशोक का शस्त्रत्याग या नाट्यछटा मधून पालकांची मने जिंकून घेतली.