केंद्र सरकारच्या आदेशामुळे उडाली खळबळ : इतर आस्थापने, संघ-संस्था, शाळा यांनाही बजावली नोटीस
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव कॅन्टोन्मेंट हद्दीतील युनियन जिमखान्यासह इतर आस्थापने असलेल्या संघ, संस्था, शाळा यांना जागा रिकामी करा, असा केंद्र सरकारचा आदेश आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या आदेशाविरुद्ध अनेक जण न्यायालयात गेले असतानादेखील गुरुवारी सरकारतर्फे जागा ताब्यात घेतली जाईल, अशी शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
गेल्या 98 वर्षांपासून युनियन जिमखाना या ठिकाणी क्रिकेट, टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, लॉन टेनिस हे खेळ खेळले जातात. या ठिकाणी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळेच अनेक खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत.
युनियन जिमखान्यामुळे विविध क्रिकेट स्पर्धा भरविण्यास मोठी मदत होते. स्पर्धात्मक खेळांना प्रोत्साहन मिळते. बेळगाव युनियन जिमखाना हे बेळगाव शहरातील एकमेव मैदान आहे. तेव्हा याचे संरक्षण होणे काळाची गरज असून, केंद्रीय मंत्र्यांनी तसेच राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन युनियन जिमखाना राखीव ठेवावा, अशी मागणी होत आहे. याबाबत युनियन जिमखाना सचिव प्रसन्ना सुंठणकर यांच्याशी संपर्क साधला असता 2 ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप करू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचबरोबर आम्ही न्यायालयात त्या आदेशाविरोधात स्थगिती मिळविण्यासाठी धाव घेतली आहे. त्यामुळे निश्चितच आम्हाला न्याय मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
युनियन जिमखान्यासह इतर शैक्षणिक संस्था, क्लब यांनादेखील नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे अचानक आलेल्या या नोटिसीमुळे खळबळ उडाली आहे.
केंद्रीय संरक्षणमंत्र्यांना पत्र…
युनियन जिमखान्याची लीज तत्कालीन संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी 2002 साली वाढवून दिली होती. त्याचप्रमाणे तत्कालीन संरक्षणमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर यांनी 2015 साली लीज वाढवून मदत केली होती. मात्र, आता अचानक जागा खाली करण्याचा आदेश आल्यामुळे युनियन जिमखाना संघटनेच्यावतीने विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांना लीज वाढवून मिळावी, याबाबत पत्र पाठविले आहे. तेही मागील संरक्षणमंत्र्यांप्रमाणे लीज वाढवून देतील, अशी आशा व्यक्त होत आहे.