कोरोनाचे जगभरात 872921 रुग्ण, 43272 जणांनी गमाविला जीव, अमेरिकेतील स्थिती अत्यंत गंभीर
जगभरात 872921 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली असून आतापर्यंत 184594 जण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. तर 43272 लोकांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. यातील 30 हजारांपेक्षा अधिक जणांचा मृत्यू केवळ युरोपमध्ये झाला आहे. इटली, स्पेन आणि फ्रान्समध्येच 20 हजारांपेक्षा अधिक जणांनी जीव गमाविला आहे. अमेरिकेत सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आल्यावरही कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या 1 लाख ते 2 लाख 40 हजारांदरम्यान राहू शकते अशी भीती व्हाइट हाउसचे अधिकारी डेबोराह बीरक्स यांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेत 4 हजारांपेक्षा अधिक बळी
अमेरिकेत मंगळवारी 811 जणांना जीव गमवावा लागला आहे. जॉन हॉपकिंस विद्यापीठानुसार तेथे आतापर्यंत 4056 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या नागरिकांसाठी पुढील दोन आठवडे अत्यंत दुःखद असतील, परंतु त्यानंतर स्थिती सुधारणार आहे. अमेरिकन नागरिकाने अवघड स्थितीसाठी तयार रहावे. यापूर्वी आम्ही कधीच अशा संकटाला सामोरे गेलेलो नाही. रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी त्यांच्याबद्दल एकजूटता तसेच प्रेम दाखविण्याची गरज असल्याचे उद्गार अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काढले आहेत.
इटलीतील बळी वाढले
इटलीमध्ये एका दिवसात 837 जणांचा मृत्यू झाला असून 4 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत तेथे 12428 जणांना जीव गमवावा लागला आहे. इटलीत 66 डॉक्टर्स कोरोनामुळे मृत्युमुखी पडले आहेत. काही दिवसांपूर्वी हा आकडा 43 इतका होता. तर देशभरातील 8956 आरोग्य कर्मचाऱयांना कोरोनाची लागण झाली आहे.
स्पेनमधील संकट कायम
स्पेनमध्ये मंगळवारी 748 जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी तेथे 913 जणांना जीव गमवावा लागला होता. देशात आतापर्यंत 9056 जण मृत्युमुखी पडले आहेत. एकूण रुग्णांची संख्या 102136 झाली आहे. स्पेनमध्ये टाळेबंदीचा तिसरा आठवडा सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजेच स्पेनच्या नॅशनल हेल्थ इमर्जन्सीचे प्रमुख फर्नांडो सिमॉन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
चीनमध्ये नवा रुग्ण नाही
चीनमध्ये मंगळवारी कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडला नसल्याने संकट निवळत असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. तर दिवसभरात केवळ 5 जणांना जीव गमवावा लागला आहे. चीनमधील स्थिती हळूहळू सुधारू लागली आहे. कोरोना विषाणूचे उगमस्थान असलेल्या वुहानमध्ये आता आंशिक स्वरुपात टाळेबंदी लागू आहे. परंतु तेथे रेल्वे आणि विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. 8 एप्रिल रोजी टाळेबंदी पूर्णपणे मागे घेतली जाणार आहे.
ऑस्ट्रेलियात वृत्तपत्रांचे मुद्रण बंद
ऑस्ट्रेलियात कोरोना विषाणूची लागण 4862 जणांना झाली असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. रुपर्ट मर्डोक यांच्या न्यूज कॉर्प या तेथील प्रमुख माध्यम समुहाने सुमारे 60 वृत्तपत्रांचे मुद्रण बंद करणार असल्याची घोषणा बुधवारी केली आहे. कोरोनामुळे जाहिराती मिळत नसल्याने माध्यम समुहाचे नुकसान होत आहे. न्यू साउथ वेल्स, व्हिक्टोरिया, क्वीन्सलँड आणि दक्षिण ऑस्ट्रेलिया या राज्यांमध्ये मुद्रण बंद होणार असून ऑनलाईन स्वरुपात वृत्तपत्रे उपलब्ध होतील, असे न्यूज कॉर्पने म्हटले आहे.
दक्षिण आफ्रिकेत भारतीयाचा मृत्यू
दक्षिण आफ्रिकेत वायरोलॉजिस्ट गीता रामजी यांचा कोरोना संसर्गामुळे मंगळवारी मृत्यू झाला आहे. दक्षिण आफ्रिकेत या महामारीमुळे मृत्युमुखी पडणाऱया त्या पहिल्या भारतीय आहेत. दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 5 जणांचा बळी गेला आहे.तर 1353 रुग्ण सापडले आहेत. 64 वर्षीय रामजी एक आठवडय़ापूर्वीच लंडन येथून परतल्या होत्या.
पाकिस्तानात संकट
पाकिस्तानातील पंजाब (708) आणि सिंध प्रांतात (676) कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. देशभरात आतापर्यंत 2042 रुग्ण सापडले आहेत. मंगळवारी पंजाबमध्ये 18 नवे रुग्ण सापडल्याने जनतेतील भीती वाढत चालली आहे. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये 148 आणि इस्लामाबादमध्ये 58 रुग्ण आढळून आले आहेत. पाकिस्तानात आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमध्ये 1789 बळी
ब्रिटनमध्ये मंगळवारी 381 जणांचा मृत्यू झाल्याने देशातील बळींचा आकडा 1789 वर पोहोचला आहे. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 25150 रुग्ण सापडले आहेत. तर फ्लोरिडा येथे जात असलेल्या ‘जानदम’ क्रूजवर एका ब्रिटिश नागरिकाचा संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. जहाजावर आतापर्यंत 4 जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. अमेरिकेच्या या जहाजातील प्रवाशांना कुठल्याच देशाने उतरण्याची अनुमती दिली नव्हती.
जगासमोरील सर्वात मोठे आव्हान
कोरोना विषाणू जगासमोरील दुसऱया महायुद्धानंतरचे सर्वात मोठे आव्हान आहे. महामारी रोखण्यासाठी जगभरातील देशांनी अधिक कठोर तसेच प्रभावी पावले उचलण्याची गरज आहे. कोरोनामुळे सामाजिक आणि आर्थिक हानी झाली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या 75 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्वात मोठय़ा जागतिक आरोग्य संकटाला तोंड देत असल्याचे विधान महासचिव ऍण्टोनियो गुतेरेस यांनी केले आहे.
15 देशांमध्ये एकही रुग्ण नाही
अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने जगाचा सर्वात मोठा डाटाबेस तयार केल आहे. विद्यापीठानुसार 180 देशांमध्ये कोरोना विषाणू पोहोचला आहे. तर 15 देशांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नसून यात उत्तर कोरियाचा समावेश आहे. बोत्सवाना, तुर्कमेनिस्तान, तजाकिस्तान, येमेन, कोमोरोस, मलावी, साओ तोमे अँड प्रिंसिपी, दक्षिण सुदानमध्ये कोरोनाने शिरकाव केलेला नाही.