खडेबाजार पोलिसांची कारवाई, बापट गल्ली येथील नागरिकांनी केला होता पाठपुरावा
प्रतिनिधी/ बेळगाव
dबापट गल्ली येथील युवकाच्या आत्महत्या प्रकरणी गुरूवारी खडेबाजार पोलिसांनी बंडू केरवाडकरला (वय 53, रा. वडगाव) अटक केली आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर 8 दिवसांच्या आत पोलिसांनी खासगी सावकाराला अटक केली असून रात्री उशीरापर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात येत होती.
खडेबाजारचे पोलीस निरीक्षक धिरज शिंदे व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी बापट गल्ली येथील विजय मनोहर गवाणे (वय 35) या युवकाने आपण काम करीत असलेल्या प्रिटींग प्रेसमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. बंडू केरवाडकरच्या सततच्या जाचामुळे आपल्या पतीने आत्महत्या केल्याची फिर्याद विजयची पत्नी मेघना यांनी दाखल केली होती.
10 टक्के व्याजाने दिलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी खासगी सावकाराने सतत जाच दिल्याने विजयने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत बंडू केरवाडकर या नावाचा उल्लेख आहे. या खासगी सावकाराच्या जाचामुळेच आपण आपले जीवन संपवित असल्याचे विजयने मृत्यू पत्रात लिहिले होते.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये विजय गवाणे या युवकाने बंडू केरवाडकर याच्याकडून 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. व्याज देण्यास विलंब झाला तर दुप्पट व्याज वसुल केला जात होता. परिस्थितीमुळे व्याज व मुद्दल थकल्यामुळे व्याज देण्यासाठी बंडू केरवाडकर कडून धमकावण्याचे प्रकार सुरू झाले. शुक्रवार दि. 6 नोव्हेंबरबर रोजी सकाळी विजयच्या घरी आलेल्या बंडूने पैसे देता आले नाही तर जीव दे असे सांगत त्याला अर्वाच्य शिवीगाळ केली होती.
या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी बंडू केरवाडकरला अटक करा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले होते. खडेबाजार पोलिसांनी गुरूवारी त्याला अटक केली आहे.