- गौरी आणि जेनिफर या सिंहीणींना कोरोनाची लागण
ऑनलाईन टीम / इटावा :
इटावा सफारी मधील दोन सिंहीणींना कोरोनाची बाधा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. येथील गौरी आणि जेनिफर या सिंहीणींना कोरोना झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर या दोन्ही सिंहीणींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सोबतच सफारी मधील डॉक्टर सर्वेश राय यांचे रिपोर्ट देखील पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, सध्या या दोन्ही सिंहीणींची तब्येत स्थिर आहे. सिंहीण गौरी आणि जेनिफर या दोघी मागील काही दिवस आजारी होत्या. त्यानंतर या दोघींसह सफारीमधील आठ सिंह आणि सिंहीणींचे नमुने तपासणीसाठी भारतीय चिकित्सा अनुसंधान संस्थान बरेली येथे पाठविण्यात आले होते. त्यातील गौरी आणि जेनिफर या सिंहीणींचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
शुक्रवारी संध्याकाळी उशीराने सफारीचे डायरेक्टर के. के. सिंह यांनी सांगितले की, 30 एप्रिल पासून सिंहीण गौरी आणि जेनिफर यांना ताप येत होतो. त्यानंतर त्यांच्या रक्ताचे आणि मलमूत्राचे नमुने 3 मे रोजी बरेली येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर सध्या या दोघी आयसोलेशनमध्ये असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.