वृत्तसंस्था/ सेंट कीट्स (बॅसेटेअर)
आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटाच्या पुरूषांच्या युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सोमवारी यजमान विंडीज आणि पाकिस्तानने विजयी सलामी देताना अनुक्रमे झिंबाब्वे आणि स्कॉटलंडचा पराभव केला.
विंडीज आणि स्कॉटलंड यांच्यातील सामन्यात विंडीजने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. विंडीज संघातील शिवशंकरने स्कॉटलंडचे पहिले तीन फलंदाज बाद केले. त्यापैकी त्याने सलग दोन चेंडूवर स्कॉटलंडच्या दोन फलंदाजांना तंबूत पाठविले. शिवशंकरने या सामन्यात 17 धावांत 3 गडी बाद केले. स्कॉटलंडतर्फे मझीदने 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करताना 11 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावातील ही दुसऱया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. विंडीज संघातील फिरकी गोलंदाज ऍमोरे आणि मेहासे यांनी 42 धावांत 4 गडी बाद केले. स्कॉटलंडचा डाव 95 धावांत आटोपला. विंडीजच्या शिवशंकरने स्कॉटलंडचा फलंदाज डेव्हिडसन याला अचूक फेकीवर धावचीत केले. सलामीच्या डेव्हिडसनने 93 चेंडूत सर्वाधिक 43 धावा जमविल्या.
विंडीजने डावाला सावध सुरूवात केली. सातव्या षटकांत विंडीजचा पहिला फलंदाज मॅथ्यू नंदू जार्वीसच्या गोलंदाजीवर 8 धावांवर बाद झाला तर चार्ली पेटने विंडीजच्या पॅरीसला बाद केले. विंडीजची स्थिती यावेळी 2 बाद 48 अशी होती. त्यानंतर यष्टीरक्षक क्लार्क आणि बिशप यांनी विंडीजला विजय मिळवून दिला. स्कॉटलंडच्या डेव्हिडसनने क्लार्कला झेलबाद केले. विंडीजने 19.4 षटकांत 3 बाद 96 धावा जमवित हा सामना सात गडय़ांनी जिंकला. बिशपने विजयी षटकार मारला.
पाकच्या हसीबुल्लाहचे शतक
या स्पर्धेतील दुसऱया एका सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकने 50 षटकांत 9 बाद 315 धावा जमविल्या. पाक संघातील हसीबुल्लाहने 155 चेंडूत 135 धावा जमविताना इरफान खानसमवेत तिसऱया गडय़ासाठी 192 धावांची भागिदारी केली. इरफानने 77 चेंडूत 8 चौकारांसह 81 धावा झळकविल्या. इरफान खान दुबेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. झिंबाब्वेतर्फे ऍलेक्स फेलाहोने 58 धावांत 5 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या वेल्च आणि सॉल यांनी सलामीच्या गडय़ासाठी 34 धावांची भागिदारी केली. त्यानंतर झिंबाब्वेचे सहा फलंदाज 77 धावांच्या मोबदल्यात बाद झाले. झिंबाब्वेच्या बेनेट आणि मॅटेरिनेका या जोडीने 83 धावांची भागिदारी केली. बेनेट बाद झाला त्यावेळी झिंबाब्वेला विजयासाठी 58 चेंडूत 121 धावांची जरूरी होती पण मॅटेरिनेका बाद झाला तसेच दुबे शेवटच्या गडय़ाच्या रूपात तंबूत परतल्याने पाकने हा सामना 115 धावांनी जिंकून विजयी सलामी दिली.