सुळगे ग्राम पंचायतीमध्ये अर्ज दाखल तर काही ठिकाणी एकही अर्ज नाही
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर, सुळगे (ये), नंदिहळ्ळी ग्राम पंचायत अखत्यारित निवडणुकीची धामधूम सुरू असून अनेकांनी अर्ज घेतले आहेत तर काहींनी अर्ज देखील भरले आहेत. सुळगे (ये) 7, यरमाळ 1, राजहंसगड 3 असे एकूण 11 अर्ज पहिल्या दिवशी दाखल झाले आहेत. यामुळे या ठिकाणी मोठी चुरस निर्माण झाली आहे.
सुळगे (ये) गावात एकूण चार सदस्य, राजहंसगड 4, यरमाळ 2 अशा एकूण सुळगे ग्राम पंचायतीला 10 सदस्य संख्या आहे. त्या ठिकाणी आता 11 अर्ज आले आहेत. शुक्रवार दि. 11 रोजी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आणखी चार दिवसांमध्ये काही जण अर्ज दाखल करण्याच्या तयारीला लागले आहेत.
येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र जवळपास 12 जणांनी अर्ज घेतले आहेत. ते लवकरच अर्ज दाखल करतील, असे सांगण्यात आले. नंदिहळ्ळी ग्राम पंचायतीमध्ये नागेनहट्टी या गावचा समावेश आहे. एकूण 10 सदस्य संख्या या ग्राम पंचायतीमध्ये आहेत. पहिल्या दिवशी 14 अर्ज दिले गेले आहेत. या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून सुधाकर बागेवाडी आणि उपनिवडणूक अधिकारी म्हणून धुळाप्पगोळ हे काम पाहत आहेत.
देसूर ग्राम पंचायतीमध्ये झाडशहापूर गावचा समावेश आहे. एकूण 12 सदस्य असलेल्या या ग्राम पंचायतीला पहिल्या दिवशी 37 अर्ज उमेदवारांनी घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणीही मोठी चुरस असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी निवडणूक अधिकारी म्हणून ए. एल. हल्याळ तर उपनिवडणूक अधिकारी म्हणून एस. बेनकनहळ्ळी हे कामकाज पाहत आहेत.