ग्राम पंचायत सदस्यांचा निर्धार ः बैठकीत विविध विषयांवर चर्चा
प्रतिनिधी/ येळ्ळूर
येळ्ळूर ग्राम पंचायत विविध विकास कामांमध्ये सक्रिय झाली आहे. याचबरोबर आता उर्वरित कामे यशस्वी करण्याचा प्रयत्न ग्राम पंचायतीच्या माध्यमातून केला जात आहे. येळ्ळूर ग्राम पंचायत ही एक मॉडल ग्राम पंचायत करण्याचा मानस ग्राम पंचायत सदस्यांनी केला आहे. त्यानुसार शुक्रवारी ग्राम पंचायतमध्ये बैठक घेऊन गावातील योजना पूर्णत्वास नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
येळ्ळूर ग्राम पंचायत सदस्य, शिक्षक, आरोग्य अधिकारी, आशा कार्यकत्या यांनी प्रत्येक वॉर्डला भेट दिली. तेथील समस्या नागरिकांकडून जाणून घेतल्या. त्याची नोंद केली. रस्त्या, गटारी याचबरोबर वृध्दांची पेन्शन आणि विद्यार्थ्यांना येणाऱया शैक्षणिक अडचणी जाणून घेतल्या आहेत. त्याबद्दल शुक्रवारच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. येत्या पाच वर्षांमध्ये सर्वांगिण विकास करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांच्यासह इतर सदस्यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.
येळ्ळूर गावच्या विकासासंदर्भात आराखडय़ाची प्रतिकृती तयार करुन त्यामध्ये कशा प्रकारे रस्ते व इतर सोयी, सुविधा उपलब्ध केल्या जातील याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, सार्वजनिक ठिकाणी सोलार बसविणे, सार्वजनिक शौचालय बांधणे, बस थांबे निर्माण करणे, पथदीप तसेच ग्राम पंचायतींच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक भिंत बांधणे, शिवाजी रोडवर वॉकिंग ट्रक उभारणे याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीमध्ये तालुका पंचायतीचे अधिकारी बी. एच. बजंत्री यांनी कशा प्रकारे विकास कामे राबविली जातात याचे मार्गदर्शन सदस्यांना केले. तुम्ही सहकार्य केला तर निश्चितच गावचा कायापाटल होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी सरकारच्या योजना या प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. गावचा सर्वांगिण विकास करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. मॉडेल ग्राम पंचायतसाठी येळ्ळूरची निवड झाली आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. सर्वांनी एकजुटीने हे काम पूर्ण करायचे आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपाध्यक्षा लक्ष्मी मासेकर, ग्राम पंचायत सदस्य रमेश मेणसे, शिवाजी नांदुरकर, पिडीओ अरुण नाईक, दयानंद उघाडे, अरविंद पाटील, काकतकर यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षिका उपस्थित होत्या.