ऑनलाईन टीम / आग्रा :
आग्रा जिल्ह्यातील दक्षिण विधानसभेचे आमदार योगेंद्र उपाध्याय आणि त्यांच्या परिवारासह 17 जण तसेच आग्र्यातील खासदार एस पी सिंह बघेल यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर आता उत्तरप्रदेश सरकारचे राज्यमंत्री चौधरी उदय भान सिंह यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी लखनऊमध्ये विधानसभेचे कामकाज सुरू व्हावे यासाठी सर्व आमदार आणि मंत्र्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये चौधरी उदय भान सिंह यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. चौधरी उदय भान सिंह सध्या लखनऊ मध्येच आहेत. 15 दिवसांपूर्वी आग्र्यामध्ये त्यांच्या सुनेला कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे निष्पन्न झाले होते.
दरम्यान, सध्या आग्र्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या 2395 इतकी आहे. तर 1998 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत 104 रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर सद्यस्थितीत 293 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.