उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांचे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन
प्रतिनिधी / खेड :
तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपन्या घातक रसायन नजिकच्या नाल्यात सोडून पाणी प्रदूषित करत असून मासे मृत्यूमुखी पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्य अँड. तु.ल. डफळे व पदाधिकाऱ्यांनी उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांची भेट घेत परिस्थिती कथन केली असता एम.आय.डी.सी.तील कंपनी अधिकाऱ्यांची मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्वासन पदाधिकाऱ्यांना दिले.
लोटे औद्योगिक वसाहतीतील काही कंपन्या रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडत आहेत. असगणी – लवेल नजिकच्या नाल्यात सलग तीन वेळा रसायन ओतण्याची पुनरावृत्ती घडली होती. या रसायनमिश्रित पाण्यामुळे खाडीतील मासे मृत्यूमुखी पडून गुरे देखील दगावत होती. दूषित पाण्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर धोक्याची टांगती तलवार कायमच आहे. दोनच दिवसापूर्वी आवाशीनजिकच्या नाल्यात घातक रसायन ओतताना दोन टॅकर चालकांना ग्रामस्थांनीच शिताफीने पकडले होते.
महामार्गावर घातक रसायन ओतण्याचे प्रकार वाढीस लागल्याने ग्रामस्थ मितीच्या सावटाखाली आहेत. उद्योग व पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे मंडणगड दौऱ्यावर आल्या असता याप्रश्नी चर्चा केली. चर्चेअंती एम आय डी.सी.तील कंपनी अधिकाऱ्यांची लवकरच मंत्रालयात बैठक घेवून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी अन्वर खान, भरत भेकरे, इकबाल खान, सागर महाडिक, स्वप्निल डफळे, विष्णू निवाते, बाईत आदी उपस्थित होते.