अलिबाग-मुरुड मार्गावरील घटना, दुचाकीस्वाराचा मृत्यू
खेड / प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील अलिबाग-मुरुड मार्गावरील काशीद येथील नाल्यावरील जुना दुचाकी व कारसह वाहून गेल्याची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. दुर्घटनेतील 6 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले.यातील विजय चव्हाण नामक दुचाकीस्वाराचा मात्र मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मुरुडकडे जाणारी वाहतूक रोहा-सुपेगाव मार्गे वळवण्यात आली.
रविवारपासून रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू आहे. सायंकाळी पावसाने रौद्ररूप धारण केले. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढली. पाण्याच्या वाढत्या प्रवाहामुळे अलिबाग-मुरुड रस्त्यावरील काशिद गावच्या नदीवर असलेला 50 वर्षाचा जुना पूल कोसळला. यात एक चार चाकी वाहन व एक दुचाकीही पाण्यात वाहून गेली.
अपघाताचे वृत्त कळताच सर्वच यंत्रणा घटनास्थळी पोहचल्या. तातडीने मदतकार्य हाती घेत वाहून गेलेल्या वाहनांचा शोध सुरू करण्यात आला. कारमधील 6 जणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र, अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याचे मुरूडचे नायब तहसिलदार रविंद्र सानप यांनी सांगितले.