प्रतिनिधी / खेड
खेड नगरपरिषद हद्दीतील अनधिकृत खोक्यांवर अखेर नगरपरिषदेने धडक कारवाईची मोहीम हाती घेतल्याने साऱ्यांचेच धाबे दणाणले आहेत. मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात अतिक्रमे हटवण्यात आली.
शहरातील अनधिकृत खोक्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अनेक व्यावसायिकांनी दुकानाबाहेरील मोकळ्या जागेत दुकाने थाटली होती. नगरप्रशासनाकडून अनधिकृत खोकेधारकांना खोके हटवण्याच्या सूचना सातत्याने देण्यात येत होत्या. मात्र, त्याकडे कानाडोळाच करण्यात आला होता. शहरातील अतिक्रमणांवर कारवाईस अखेर नगरप्रशासनास मुहूर्त मिळाला आहे.
शहरातील बसस्थानक, महाडनाका, शिवतररोड, समर्थनगर, क्षेत्रपालनगर, नाना-नानी पार्क, बाजारपेठ व अन्य प्रभागातील खासगी मालकीची दुकाने, व्यापारी संकुलातील दुकानदारांनी दुकानाबाहेर केलेले गटार व रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आली. ही अतिक्रमणे हटवताना काही ठिकाणी वादाचे प्रसंग देखील उदभवले. मात्र, काही ठिकाणी दुकानदारांनी स्वत: हून अतिक्रमणे हटवण्यासाठी पुढाकार घेतला. सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामे नागरिकांनी स्वतःहून हटवण्याचे आवाहन मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांनी केले आहे.