प्रतिनिधी/रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना पॉझिटीव्हचा आकडा आता 35 पार केल्याने जिल्हा ‘रेड झोन’मध्ये गेल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरू असली तरी जिल्हा अद्यापही ‘रेड झोन’मध्ये नाही. झोन ठरवण्याचा अधिकार केंद्रीय समितीला आहे. या समितीने अद्यापही अशी काही घोषणा केली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली. त्यामुळे रूग्ण संख्या वाढती असली तरी रत्नागिरी जिल्हा ‘रेड झोन’मध्ये आलेला नाही.
चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी परवानगी मिळावी, म्हणून सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती. त्यानुसार गेल्या आठवडय़ापासून पुणे, मुंबईतील चाकरमानी मोठय़ा संख्येने कोकणात दाखल होवू लागले आहेत. रत्नागिरी जिल्हय़ात तत्पूर्वी केवळ 6 पॉझिटीव्ह रूग्ण होते. यातील एकाचा मृत्यू तर पाचजण पूर्णपणे बरे होवून घरी परतले होते. त्यामुळे रूग्णसंख्या शुन्यावर असल्याचा मोठा दिलासा रत्नागिरीकरांना मिळत असतानाच या 2 आठवडय़ात मुंबईतून प्रवास करून आलेले 28 प्रवासी पॉझिटीव्ह निघाले आहेत. ही संख्या आणखीन झपाटय़ाने वाढणार असल्याचा अंदाज आता प्रशासनाकडून होत असला तरी महिनाभर संयम ठेवून नियम पाळणाऱया रत्नागिरीकरांमधून संताप व्यक्त केला जात आहे. सद्यपरिस्थितीत चाकरमान्यांना जिल्हय़ात आणणे चुकीचे आहे. त्यामुळे याचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढेल. रत्नागिरी जिल्हा चाकरमान्यांमुळे रेड झोनमध्ये गेल्याच्या पोस्ट मोठय़ा प्रमाणावर सोशल मिडियावर व्हायरल होवू लागल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी रेड झोनसंदर्भात जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण
मिश्रा यांना विचारले असता अद्यापही रत्नागिरी जिल्हा ‘रेड झोन’मध्ये नाही. झोन ठरवण्याचे अधिकार केंद्रीय समितीला (आयसीएमआर) असल्याची माहिती जिल्हाधिकारी त्यांनी दिली. असे आदेश अद्याप तरी नाहीत, असेही त्यांनी सांगितले. तसेच सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणावर वाढत असून अन्य जिल्हय़ातून येणाऱया व्यक्तींना संस्थात्मक क्वारटाईन करण्यात येत आहे. मुंबई, पुणे व अन्य जिल्हय़ामधून येणाऱया प्रवाशांमध्ये गरोदर माता, लहान मुले, वृध्द व्यक्ती, अपंग व्यक्ती व दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींचा समावेशही आहे. तर त्यांची तपासणी करून होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे व त्यांची आरोग्याची तपासणी रोजच्या रोज आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत करण्यात यावी, असेही आदेश देण्यात आले आहेत.