पोलीस ठाण्यात व तहसिलदारांकडे तक्रार
प्रतिनिधी / दापोली
दापोली तालुक्यातील भडवळे येथील रास्त धान्य दुकानाचे नुकसान करून दुकान चालकांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणाची तक्रार रास्तदुकान चालक काशिनाथ लेंढे यांनी तहसिलदार व पोलीस ठाण्यात दिली आहे.
त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार काशिनाथ लोंढे हे भडवले येथील रास्त धान्य दुकान चालवतात. गावातील तुषार खांबे, रूशाळ खांबे, तेजल खांबे, तानाजी खांबे यांनी येवून श्री. लोंढे यांना व त्यांच्या कुटुंबियांना ठार मारण्याची नुकतीच धमकी दिली. तसेच त्याचवेळी रास्त धान्य दुकानात येवून रेशन संदर्भात रेशनींगचे बोर्ड फाडून टाकले व लोंढे यांच्या अंगावर काठ्या फेकून मारल्या. याच लोकांनी त्यांना ठार मारीन अशी धमकी पोलीस पाटील, सरपंच यांच्या समोर दिल्याचे लोंढे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
सदरील व्यक्ती या पुणे येथे रहातात. तुषार खांबे, अमोल रेवाळे, पांडूरंग जाधव या व्यक्ती सर्व रा. पुणे यांनी उसवाडीमध्ये कार्डधारकांच्या तक्रारी नाही तरी या लोकांनी रात्रीच्या वेळी जावून रेशन कार्ड मागून तुम्हाला रेशन कार्डवरती धान्य किती भेटले अशा प्रकारची चौकशी केली. रेशन कार्ड देत नसतानाही कार्ड मागून घेतले. त्यामुळे तुषार खांबे हा रेशनिंगविषयी लोकांच्यात गैरसमजूत करत लोंढे यांच्याशी वाद घालत लोंढे यांना शिवीगाळ व दमदाटी करत नातेवाईकांना बोलावून आणले व त्याच्या नातेवाईकांनी देखील ग्रामस्थ रामचंद्र फडकले यांच्या समोर शिवीगाळ केली. नारायण रेवाळे, सागर जाधव यांनी देखील त्यांना साथ देत लोंढे यांना त्रास दिला असे या तक्रारीत नमुद केले आहे.
या सार्या घटनेविरोधात काशिनाथ लोंढे यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलीसांनी याची तात्काळ दखल न घेतल्याने तुषार खांबे यांची लवकरात लवकर चौकशी व्हावी व आपणास न्याय मिळावा अशी तक्रार लोंढे यांनी तहसिलदार यांच्याकडे केली. तसेच यांच्या पासून संरक्षण मिळावे तसेच या घटनेची चौकशी झाल्याशिवाय ऑगस्ट महिण्याचा धान्य भरणा करू शकत नसल्याचे व या संबंधित व्यक्तीपासून धोका असल्याची तक्रार काशिनाथ लोंढे यांनी दापोली तहसिलदारांकडे केली आहे. त्याचबरोबर त्यांना झालेल्या जिवे मारण्याच्या धमकीची व रेशनिंगचे बोर्ड फाडल्याची तक्रार देखील त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात केली असून या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम. जी. हळदे करीत आहेत.