आय.एम.ए कडून मागणी
रत्नागिरी / प्रतिनिधी
महाराष्ट्रातील वृत्तवाहिनीवरील एका कार्यक्रमात खासदार संजय राउत यांनी डॉक्टर्स, कम्पाउंडर आणि जागतिक आरोग्यसंघटना (WHO ) यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील सर्व डॉक्टरांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटत आहेत. संजय राउत यांनी ही विधाने मागे घ्यावीत आणि त्याबाबत दिलगिरी व्यक्त करावी, असा ठराव, आय.एम.ए.च्या १६ ऑगस्ट २०२० रोजी झालेल्या राज्यस्तरीय कार्यकारिणीत एकमताने मंजूर करण्यात आला. आज कोरोनाच्या विळख्यात संपूर्ण महाराष्ट्र सापडलेला आहे. महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या आपल्या सरकारच्या आवाहनाला साथ देत महाराष्ट्रातील ३ लाख डॉक्टर्स रात्रंदिन कठोर परिश्रम घेत आहेत. या प्रयत्नात महाराष्ट्रातील सुमारे पन्नास डॉक्टरांनी आपले प्राणही गमावले आहेत.
आयएमए महाराष्ट्र राज्याच्या २१६ शाखांनी आणि ४५ हजार उच्चशिक्षित सदस्यांनी, महाराष्ट्र सरकारच्या आवाहनांना नेहमीच साथ देत, मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक बांधिलकी राखून कार्य केले आहे आणि करत आहोत. अशाप्रसंगी डॉक्टरांबाबत खासदार राऊत यांच्या अशी खिल्ली उडवणाऱ्या विधानांमुळे आपल्या महाराष्ट्रातील डॉक्टरांचे मनोधैर्य नक्कीच खचले आहे. डॉक्टरांबद्दल विविध प्रकारची अपमानास्पद आणि अवमानकारक विधाने वृत्तपत्रात, मिडिया आणि सोशल मिडीयामध्ये करणे, हा एक ट्रेंडच सध्या सुरु झाला आहे.
महाराष्ट्रातील डॉक्टर्स ज्या गोष्टींना जबाबदार नाहीत, त्याबाबत त्यांना दोषी मानून त्यांचे मनोबल खच्ची करण्याच्या या कोरोनापेक्षाही महाभयानक साथी’मुळे तमाम डॉक्टर मनातून कष्टी झाले असून, त्यांना या साथीत काम करणे अशक्य होत आहे. कृपया याबाबतीत आपण त्वरित कार्यवाही करावी, त्याचप्रमाणे कोव्हिडच्या या जागतिक साथीमध्ये डॉक्टरांबद्दल अशी मानहानीकारक एकतर्फी विधाने कुणीही करू नये अशी सूचना आपण जारी करावी अशी मागणी आयएमए करण्यात आली आहे.