मानकरी, हक्कदार-भाविकांच्या उपस्थितीत गदगेवर विराजमान : आज-उद्या ओटी भरण्याचा कार्यक्रम
वार्ताहर / हिंडलगा
हिंडलगा येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त बुधवारी देखील रथोत्सव मिरवणुकीला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी 10 पासून बेळगाव-वेंगुर्ला रोडवरून मिरवणुकीला सुरुवात करून दुपारी दीड वाजण्याच्या रथोत्सवाची सांगता झाली. त्यानंतर विधिवत पूजा करून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
मंगळवारी रथोत्सवाला सुरुवात करून सायंकाळी सूर्यास्तापूर्वी रथ मिरवणूक थांबविण्यात आली होती. नियोजनानुसार पुन्हा बुधवारी सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सवाला सुरुवात करून वाजत गाजत गदगेपर्यंत नेण्यात आली. त्यानंतर मानकरी, हकदारी व भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या मूर्तीला गदगेवर विराजमान करण्यात आले. यावेळी भाविकांनी ‘श्री महालक्ष्मीच्या नावान चांगभलं’च्या गजरात परिसर दणाणून सोडला होता. याठिकाणी विधीपूर्वक मानाचा नैवैद्य दाखवून ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. तर गुरुवारी व शुक्रवारी ओटी भरण्याचा कार्यक्रम होणार आहे. मिरवणुकी दरम्यान बेळगाव ग्रामीण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तर रथोत्सव यशस्वी करण्यासाठी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सदस्य, युवा कार्यकर्ते व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.