वॉशिंग्टनमधील राजदूताला परत बोलाविले
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
जो बायडेन यांनी सत्ताग्रहण करताच अमेरिकेचा रशियासोबतचा तणाव वाढतच चालला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांना ‘खुनी’ म्हणून संबोधिले आहे. पुतीन यांना त्यांच्या कृत्यांची किंमत मोजावी लागेल, असा इशाराही बायडेन यांनी दिला आहे. या इशाऱयानंतर रशियाने अमेरिकेतील स्वतःचा राजदूत माघारी बोलाविला आहे.
रशियाच्या नेत्याने अमेरिकेतील अध्यक्ष निवडणुकीत माझ्या उमेदवारीला नुकसान पोहोचविण्याचा आणि डोनाल्ड ट्रम्प यांना बळ पुरविण्याचा प्रयत्न केला होता, असे बायडेन एका मुलाखतीत म्हटले आहे. बायडेन यांच्या या विधानानंतर अमेरिकेला कठोर संदेश देण्यासाठी रशियाने स्वतःच्या राजदूताला परत बोलाविले असल्याचे मानले जात आहे.
अवघड काळातून जात असलेल्या द्विपक्षीय संबंधांना अमेरिकेने रसातळाला पोहोचविले आहे. परतीची शक्यता नसावी संबंध बिघडू नयेत असा आमचा प्रयत्न आहे. पण अमेरिकेला याच्याशी संबंधित जोखीम ज्ञात असायला हवी असे उद्गार रशियाच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी काढले आहेत.
चिंतेचा विषय असलेल्या प्रकरणांमध्ये आम्ही बोलणार हे स्पष्टच आहे. निश्चितपणे रशियाने उचललेल्या पावलांसाठी त्याला उत्तरदायी ठरविले जाणार असल्याचे विधान व्हाइट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी केले आहे. बायडेन प्रशासन सत्तेवर आल्यापासून अमेरिकेने रशियाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.