50 हजार वर्षे जुन्या प्राण्यांच्या जीवाश्मातून विषाणू काढतोय
कोरोना महामारीदरम्यान रशियाने उचललेल्या एका पावलामुळे जगभरातील वैज्ञानिकांची चिंता वाढली आहे. रशिया आता 50 वर्षे जुन्या प्राण्यांच्या जीवाश्मामधून त्या काळातील विषाणू बाहेर काढत आहे, जे आता अस्तित्वात नाहीत. प्राण्यांचे हे जीवाश्म सायबेरियाच्या बर्फाच्छादित भागात सापडले आहेत. हे जीवाश्म तेथे हजारो वर्षांपासून बर्फाखाली गाडले गेले होते. रशियाचे वैज्ञानिक प्राचीन वूली हत्ती आणि गेंडय़ांचे जीवाश्म तसेच प्राग ऐतिहासिक काळातील श्वान, अश्व, उंदिर आणि सशाचे अवशेष बाहेर काढत आहेत.
सर्वात जुने जीवाश्म सुमारे 50 हजार वर्षांपूर्वीचे असून ते लेमिंगचे (उंदरासारखा प्राणी) आहे. अशाप्रकारच्या प्राचीन विषाणूवर संशोधन केल्याने गूढ आजारांच्या संक्रमणाचा धोका राहणार असल्याचा इशारा तज्ञांनी दिला आहे. प्राग ऐतिहासिक काळात सायबेरियात उणे 50 अंश तापमानातही जिवंत राहणारे अश्व आढळून यायचे.
40 वर्षे जुना गेंडा
जगात वास्तव्ययोग्य सर्वात थंड ठिकाणांपैकी एक रशियाच्या सायबेरिया भागात वूली गेंडय़ाचे अवशेष मिळाले आहेत. वूली गेंडय़ाचे विशाल अवशेष याकूतिआन भागात आढळले असून हा सदैव बर्फाच्छादित असतो. गेंडय़ाचे हे अवशेष सुमारे 40 हजार वर्षे जुने आहेत. एवढी वर्षे उलटून देखील या वूली गेंडय़ाचे 80 टक्के ऑर्गेनिक मटेरियल अद्याप कायम आहे. यात गेंडय़ाचे केस, दात शिंग आणि चरबीचा समावेश आहे.