सिंगापूरमध्ये 55 वा राष्ट्रीय दिन साजरा : जगभरात 1 कोटी 98 लाख 30 हजार 301 बाधित
जगभरात कोरोना विषाणूची बाधा 1,98,30,301 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 27 लाख 37 हजार 680 बाधितांना महामारीपासून मुक्ती मिळाली आहे. 7 लाख 30 हजार 151 रुग्ण दगावले आहेत. रशियात दिवसभरात 5,189 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर देशातील बाधितांचे प्रमाण 8 लाख 87 हजार 536 झाले आहे. रशियाच्या कोरोना टास्कफोर्सनुसार मागील 24 तासांमध्ये तेथे 77 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर तेथील बळींचा आकडा 14,931 वर पोहोचला आहे. सिंगापूरमध्ये रविवारी महामारीदरम्यान देशाचा 55 वा राष्ट्रीय दिन साजरा करण्यात आला आहे. पंतप्रधान ली सेन लूंग यांनी लोकांना एकजूट होऊन महामारीच्या विरोधात लढण्याचे आवाहन केले आहे. महामारी आताच संपुष्टात येणार नाही. आमच्या प्रयत्नानंतर देखील देशात रुग्ण वाढत आहेत. अशा स्थितीत सुरक्षा उपायांचे पालन करण्यावर लक्ष देणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
न्यू साउथ वेल्समध्ये निर्बंध
ऑस्ट्रेलियाच्या सरकारने न्यू साउथ वेल्स प्रांतात प्रवासाशी संबंधित नवे निर्बंध लागू केले आहेत. तेथे मागील महिन्यात नवे रुग्ण सापडल्यावर यापूर्वीच कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. न्यू साउथ वेल्समध्ये शेजारी प्रांत व्हिक्टोरिया येथून परतणाऱया सर्व लोकांना दोन आठवडय़ांपर्यंत हॉटेलमध्ये क्वारेंटाईन केले जाणार आहे. केवळ देशांतर्गत विमानोड्डाणांद्वारेच व्हिक्टोरियाचे लोक न्यू साउथ वेल्स येथे जाऊ शकतील. या दोन्ही प्रांतांमधील सीमा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
जनजीवन पूर्वपदावर
न्यूझीलंडमध्ये मागील 100 दिवसांमध्ये देशांतर्गत संसर्गाचे एकही प्रकरण आढळून आलेले नाही. देशात 1,219 बाधित सापडले होते आणि यातील बहुतांश जण बरे झाले आहे. सद्यकाळात देशात केवळ 23 रुग्णांनाच आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. अन्य देशांमध्ये रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने आम्हाला सावध राहण्याची गरज असल्याचे न्यूझीलंडच्या आरोग्य विभागाचे महासंचालक डॉ. एशले ब्लूमफील्ड यांनी म्हटले आहे.
मेक्सिको : संसर्ग वाढताच
मेक्सिकोमध्ये मागील 24 तासांमध्ये 6,495 नवे रुग्ण सापडले असून 695 जणांचा मृत्यू ओढवला आहे. याचबरोबर देशातील बाधितांचे एकूण प्रमाण 4 लाख 75 हजार 902 झाले आहे. तेथे आतापर्यंत 52 हजार 06 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. कोरोना संसर्गाप्रकरणी मेक्सिको जगात 6 व्या तर बळींप्रकरणी तिसऱया स्थानावर आहे. तरीही मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅनुअल लोपेझ ओब्राडोर यांनी देशात रोजगार वाढत असल्याचा दावा केला आहे.
अमेरिकेत विशेष पॅकेज
अमेरिकेत 1 लाख 65 हजार 074 जणांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण जगातील एकूण बळींच्या एक चतुर्थांश इतके आहे. तर रुग्णसंख्या 51 लाख 50 हजार 060 वर पोहोचली आहे. अमेरिकेत कॅलिफोर्निया प्रांतात सर्वाधिक संकट दिसून येत आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी महामारीच्या कारणामुळे नुकसान झेलणाऱया अमेरिकेच्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी एका विशेष दिलासा पॅकेजच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे.
ब्राझील : लाख बळी
ब्राझीलमध्ये दिवसभरात 905 जणांना जीव गमवावा लागला असून 49 हजार 970 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर तेथील बळींचा आकडा 1,00,543 वर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 30,13,369 रुग्ण सापडले आहेत. साओ पाउलो या प्रांतात 25 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ब्राझील कोरोना संसर्गाप्रकरणी अमेरिकेनंतर जगात दुसऱया स्थानावर आहे.
भारताकडून नेपाळला मदत
कोरोना महामारीदरम्यान भारताने रविवारी नेपाळला 10 व्हेंटिलेटर्स सोपविले आहेत. ग्रँड हॉल, सैन्य मुख्यालयात एका सोहळय़ात नेपाळमधील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्याद्वारे सैन्यप्रमुख जनरल पूर्णचंद्र थापा यांना हे व्हेंटिलेटर्स सुपूर्द करण्यात आले आहेत. मदत तसेच अन्य सहाय्य भारताने वारंवार नेपाळला पुरविले आहे. दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान मानवी सहकार्याचा भाग म्हणून व्हेंटिलेटर्स देण्यात आले आहेत असे उद्गार भारतीय दूतावासाने काढले आहेत.
मास्क चॅलेंज स्वीकारा, मास्कयुक्त सेल्फी पोस्ट करा
मास्क परिधान करण्याप्रकरणी भारत 5 व्या स्थानावर
कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी सर्वात पहिली आणि आवश्यक गोष्ट आहे मास्क. जगभरातील लोकांदरमन मास्कच्या वापरासंबंधी जागरुकता वाढविण्याच्या उद्देशाने जागतिक आरोग्य संघटनेने ‘हॅशटॅग वियर ए मास्क चॅलेंज’ची सुरुवात केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेस यांनी चित्रफितरुपी संदेश प्रसारित करत याची माहिती दिली आहे.
वियर ए मास्क चॅलेंज
या चॅलेंज अंतर्गत लोकांना मास्क परिधान केलेले छायाचित्र किंवा चित्रफित समाजमाध्यमांवर प्रसारित करावी लागणार आहे. तसेच स्वतःच्या मित्रमैत्रिणींनाही हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी नॉमिनेट करावे लागेल. या कृतीतून मास्कसंबंधी लोक अधिक जागरुक होतील आणि कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहू शकतील.
केवळ मास्क पुरेसा नाही
कोरोना विषाणूच्या विरोधातील युद्धात मास्क एक महत्त्वाचे शस्त्र असले तरीही ते पुरेसे नाही. याचबरोबर लोकांना सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेची खबरदारी घ्यावी लागणार आहे. एप्रिलच्या अखेरीस झालेल्या एका राष्ट्रव्यापी सर्वेक्षणानुसार शहरांमध्ये राहणारे 4 पैकी 3 भारतीय मास्क परिधान करत आहेत.
भारतात गांभीर्याचा अभाव
भारतात लोक अद्याप योग्यप्रकारे मास्क परिधान करण्यासंबंधी जागरुक नाहीत. राजधानी दिल्लीत पोलिसांनी जून महिन्यात टाळेबंदी हटविण्यात आल्यावर 66 हजर 181 लोकांना मास्क परिधान न केल्याप्रकरणी दंड ठोठावला होता. तर सिलिकॉन व्हॅली मानल्या जाणाऱया बेंगळूर शहरात अनलॉक टप्प्यादरम्यान मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱया 47 हजार लोकांवर 88 लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा दंड ठोठावण्यात आला होता.
चॅलेंज का स्वीकारावे?
15 देशांच्या सर्वेक्षणाच्या अहवालानुसार मास्क परिधान करण्याप्रकरणी भारत (76 टक्के) 5 व्या स्थानावर आहे. मास्क परिधान करण्याप्रकरणी भारताच्या तुलनेत व्हिएतनाम (91 टक्के), चीन (83 टक्के), इटली (81 टक्के) आणि जपान (77 टक्के) आघाडीवर आहेत. मास्कच्या वापराप्रकरणी अनेक मोठे देश अद्याप पिछाडीवर आहेत. ब्रिटनमध्ये केवळ 16 टक्के, जर्मनीत 20 टक्के, ऑस्ट्रेलियात 21 टक्के, कॅनडात 28 टक्के आणि फ्रान्समध्ये 34 टक्के लोक मास्क परिधान करत आहेत.