ऑनलाईन टीम / मॉस्को :
जगातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस तयार केल्याचा दावा करणाऱ्या रशियात आता 12 ऑगस्टपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण केले जाणार आहे. गॅमॅलेई नॅशनल रिसर्च सेंटर फॉर एपिडेमिलॉजी आणि मायक्रोबायोलॉजीचे संचालक अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
रशियात तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्याचा दावा यापूर्वीच करण्यात आला होता. मॉस्को स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीने या लसीचे क्लिनिकल ट्रायल पूर्ण केले आहे. मानवी चाचणीअंतर्गत स्वयंसेवकांच्या पहिल्या गटाला 15, तर दुसर्या गटाला 20 जुलै रोजी घरी जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. लसीची पहिली मानवी चाचणी 38 लोकांवर एक महिना चालली. 18 जूनपासून लसीच्या चाचणीला सुरुवात झालेली आहे.
मानवी चाचणी यशस्वी झाल्यानंतर रशियाने या लसीचे 3 कोटी डोस उत्पादित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 1 कोटी 70 लाख अन्य देशात तयार करण्यात येणार आहेत. या लसीचे डोस 12 ते 14 ऑगस्टदरम्यान रशियातील लोकांना देण्यास सुरुवात होईल.