वार्ताहर / तुडये
मान्सूनपूर्व पावसाने बुधवारी दिवसभर दमदार हजेरी लावल्याने बेळगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱया राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत अर्ध्या फुटाने वाढ झाली आहे. बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2454.30 फूट होती. त्यामध्ये सायंकाळी अर्ध्या फुटाने वाढ होत पाणीपातळी 2454.80 फूट झाली आहे.
मागील वषी पाणीपातळीने निच्चांकी पातळी गाठली होती. डेडस्टॉकमधील पाणी पाच विद्युत मोटारींद्वारे उपसा करत शहराला पाणीपुरवठा करावा लागला होता. यावेळी मात्र कोरोना महामारीच्या अनुषंगाने बेळगाव शहरातील संपूर्ण व्यवहार दोन महिने बंद झाल्याने हॉटेल व अन्य व्यवसायांकडून पाणी वापर कमी झाला. मात्र, जलाशय स्थापनेपासून प्रथमच 7 ते 8 बॅकप्रेशरने (बीपी) पाणीपुरवठा करण्यात आला. यापूर्वी हा पाणीपुरवठा 3 ते 4 बॅकप्रेशरने करण्यात येत होता.
मागील वषी 3 जून रोजी जलाशयाची पाणीपातळी 2448.50 फूट होती. गतवषीच्या मानाने यंदा 6.3 फूट पाणीसाठा जादा आहे. मागीलवषी जून महिन्यात पाणीपातळी डेड स्टोरेजमधील होती.