आमदार नीळकंठ हळर्णकर यांच्याकडून किरण कांदोळकरांच्या वक्तव्याचा निषेध
प्रतिनिधी /म्हापसा
गोवा फॉरवर्डचे नेते किरण कांदोळकर यांनी स्वतःच्या फायद्यासाठी श्री देवी शांतादुर्गाचा वापर एका व्यक्तीसाठी केलेला वापर चुकीचा आहे. उत्तर व दक्षिण भारतातील अरसुरक्षीत राज्यातील पक्षांना गोव्यात आणून एकमेकांशी बंड, भांडणे करण्यास लावण्याचा प्रयोग करणे लोकशाही आहे का? या माजी आमदाराच्या वृत्तीचा आपण व थिवी भाजप मंडळा निषेध करीत असल्याची माहिती थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी कोलवाळ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
पुढे आमदार हळर्णकर म्हणाले, पीर्ण व अस्नोडा गावात ग्रामदेवता शांतादुर्गा आहे. देवीच्या आशीर्वादानेच ग्रामस्थांवर चांगले संस्कार झाले, राज्यात नैसर्गिक आपत्ती कधीच आली नाही मात्र अशा देवीचा आपल्या राजकीय फायद्यासाठी उच्चार एका राजकीय महिला नेत्याशी करणे कांदोळकर यांना शोभत नाही. हा पीर्ण व अस्नोडा या दोन्ही गावांचा अपमान आहे. त्यांच्या या वृत्तीचा थिवी भाजप मंडळ निषेध करीत असल्याचे आमदार हळर्णकर म्हणाले.
तिकीट द्यावी की नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा : हळर्णकर
भाजप समविचारी स्थानिक पक्षांशी युती करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी स्पष्ट केले आहे यावर आमदार हळर्णकर यांनी, युती करायची की नाही हा पक्षश्रेष्ठीं ठरविणार आहे. आपला पक्षश्रेष्ठींवर विश्वास आहे. त्यामुळे तिकीट द्यायचा की नाही हा निर्णय पक्षश्रेष्ठींचा आहे, असे हळर्णकर म्हणाले.
तो शब्द कांदोळकरांनी मागे घ्यावा : शरद गाड
शरद गाड म्हणाले, माजी आमदार कांदोळकर यांनी बंगालच्या दिदीला देवीची उपमा देणे चुकीचे आहे. देवी शांतादुर्गेचा आम्ही आदर करतो. देवीमुळे आज शांतता आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या जी वृत्ती आहे ती गोव्यात येऊ देणार नाही. आम्हाला दरवर्षी दुर्गा देवीची पुजा करायची आहे दिदीची नाही. कांदोळकरांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.