जलद चाचणीत दहा निघाले पॉझिटिव्ह
प्रतिनिधी / मडगाव
राजधानी विशेष एक्सप्रेस रेलगाडीतून काल रविवारी एकूण 368 प्रवासी गोव्यात आले. तर शनिवारी एकूण 288 प्रवासी आले होते. शनिवारी आलेल्या प्रवाशांना फातोर्डा स्टेडियमवर विलगीकरण केंद्रात ठेवण्याले. या ठिकाणी अनेकांना रात्रभर बसून काढावी लागली. तर काल आलेल्यांची सोय हॉटेलमध्ये करण्यात आली. काल आलेल्या प्रवाशांमध्ये दहा जण जलद चाचणीत पॉझिटिव्ह सापडले. त्यांचा अंतिम अहवाल येणे बाकी होता.
रेलगाडीतून आलेल्या प्रवाशांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. शनिवारी स्वता जिल्हाधिकारी अजित रॉय हे उपस्थित राहून त्यांनी प्रवाशांची माहिती घेतली होती. दरम्यान, रेल्वेतून येणाऱया प्रवाशांकडून शुल्क आकारले जात असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर कायम होता.
दिल्लीत सद्या रेड झोनमध्ये असून याच ठिकाणाहून येणाऱया राजधानी विशेष एक्सप्रेसमधून कोरोना संक्रमित प्रवासी गोव्यात पोचले आहेत व गोव्यात कोरोना बाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. दरम्यान, राजधानी विशेष एक्सप्रेसमधून कोरोना संक्रमित प्रवासी आल्याने ही गाडी बंद करावी अशी संपूर्ण राज्यातून मागणी होऊ लागल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील आठवडय़ात राजधानी गोव्यात येणार नसल्याचे संकेत दिले आहे.
अन्य राज्यातून येणाऱया रेलगाडय़ातून अवघेच प्रवासी येतात व त्यात एकही संक्रमित रूग्ण सापडला नसल्याने या रेलगाडय़ा चालू ठेवल्या जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
गोव्यातून 700 प्रवासी दिल्लीकडे
काल राजधानी एक्सप्रेसमधून मडगाव स्थानकावरून सुमारे 700 प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले. यातील काही प्रवासी हे मुंबई तर उर्वरित दिल्लीकडे जाणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱयांनी दिली.
करमळीहून निघाली श्रमिक ट्रेन
दरम्यान, काल करमळीहून सांयकाळी श्रमिक ट्रेन हरिद्वारकडे निघाली. या ट्रेनमधून अनेक परप्रांतीय कामगारांनी परतीचा मार्ग धरला. आज सोमवारी मडगाव स्थानकावरून श्रमिक ट्रेन निघणार आहे. श्रमिक ट्रेनमुळे गोव्यात अडकून पडलेले असंख्य परप्रांतीय कामगार आपल्याकडे गावाकडे पोचले आहेत. तर काहींना बसमधून गावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.