खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे प्रांताधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी/ खेड
मुंबई-दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजमुद्रावर केलेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवत आंबेडकरी जनतेच्या भावनांचा उद्रेक होण्यापूर्वी हल्लेखोरांना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्या, अशा मागणीचे निवेदन तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे वतीने प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना शनिवारी देण्यात आले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्ला म्हणजे त्यांच्या विचारांसह आंबेडकरी जनतेच्या स्वातंत्र्यावर तसेच अस्मितेवर झालेला हल्ला आहे. एकीकडे डॉ. आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूंचे संवर्धन केले जाते, दुसरीकडे मात्र त्यांच्या निवासस्थानावरच हल्ला केला जातो हे अशोभनिय असून संशयास्पद असल्याचे या निवेदनात नमूद केले आहे.
याप्रसंगी तालुका बौद्ध समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजरत्न तांबे, संदीप तांबे, वीरसेन मोरे, सरचिटणीस दीपक मोहिते, गोविंद यादव, नितीन शिर्के, भालचंद्र तांबे, सुनील शिर्के, किशोर धुत्रे, संतोष मोरे आदी उपस्थित होते.