दुबई / वृत्तसंस्था
राजस्थान रॉयल्स, किंग्स इलेव्हन पंजाब व कोलकाता नाईट रायडर्स हे तीन संघ यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले. रॉयल्स व पंजाबचे संघ चार्टर्ड फ्लाईटने येथे आले तर त्यानंतर काही तासात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ अबुधाबीत दाखल झाला. केकेआर संघाचे या स्पर्धेदरम्यान अबुधाबीतच अधिक वास्तव्य असणार आहे. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ शुक्रवारी उशिराने युएईमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. यंदा आयपीएल हंगामाची सुरुवात मुंबई इंडियन्सच्या लढतीनेच होणार आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा 53 दिवस चालणार असून त्यात दुबई, अबुधाबी व शारजा या तीन ठिकाणी 60 सामने खेळवले जाणार आहेत. यापूर्वी 2014 मध्ये देखील युएईमध्ये आयपीएलचे काही सामने झाले होते. भारतातील सार्वत्रिक निवडणुकांमुळे तो निर्णय घेण्यात आला होता. यंदा कोव्हिड-19 च्या अस्मानी संकटामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा संयुक्त अरब अमिरातीत होणार आहे.
नव्या आयपीएल लोगोचे अनावरण
ड्रीम 11 ही कंपनी यंदाचे टायटल स्पॉन्सर असतील, हे स्पष्ट झाल्यानंतर आयपीएलच्या नव्या लोगोचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. आयपीएलने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर नवा लोगो पोस्ट केला. नव्या लोगोमध्ये अर्थातच ड्रीम 11 कंपनीचा समावेश आहे. ड्रीम 11 ही फॅन्टसी गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी ओळखली जाते. ड्रीम 11 कंपनीने 222 कोटी रुपये मोजत यंदाचे प्रायोजकत्व प्राप्त केले. पण, 2021 व 2022 या वर्षाकरिता त्यांनी दिलेला प्रस्ताव बीसीसीआयने फेटाळून लावला.
पुन्हा एकदा धोनीच आकर्षण केंद्र
महेंद्रसिंग धोनी, सुरेश रैना, रविंद्र जडेजासह चेन्नई सुपरकिंग्स संघाचे खेळाडू देखील लवकरच संयुक्त अरब अमिरातमध्ये दाखल होणे अपेक्षित असून शुक्रवारी रवाना होण्यापूर्वी या खेळाडूंनी सोशल मीडियावर काही छायाचित्रे शेअर केली. चेन्नई संघाच्या ट्वीटर हँडलवर देखील खेळाडू हॉटेलवर एकत्रित आल्याचे छायाचित्र पोस्ट केले गेले. गतवर्षी चेन्नईला आयपीएल फायनलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न चेन्नईचा येथे असेल. आजवर मुंबई इंडियन्सने 4 तर चेन्नईने 3 जेतेपदे मिळवली आहेत. त्या निकषावर मुंबई इंडियन्सशी बरोबरी साधणे, हे देखील चेन्नई संघाचे लक्ष्य असणार आहे.
दरम्यान, 15 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी निवृत्ती जाहीर करणाऱया महेंद्रसिंग धोनी व सुरेश रैना यांचे चाहत्यांना मुख्य आकर्षण असेल. धोनी मागील वर्षी संपन्न झालेल्या वनडे विश्वचषकानंतर एकही व्यावसायिक लढत खेळलेला नाही. त्यामुळे, तो मैदानात उतरण्याच्या क्षणाची त्याच्या चाहत्यांना आस असणे साहजिक आहे.
लसिथ मलिंगा उशिराने दाखल होणार
लंकेचा स्टार जलद गोलंदाज लसिथ मलिंगा त्याचे वडील आजारी असल्याने मुंबई इंडियन्स प्रँचायझीतर्फे पहिले काही सामने खेळू शकणार नाही, असे शुक्रवारी स्पष्ट झाले. मलिंगाने याबाबत मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाला रितसर कल्पना दिली. त्याचे वडील आजारी असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. त्या पार्श्वभूमीवर, मलिंगा पहिल्या काही सामन्यात निश्चितपणाने खेळू शकणार नाही, असे संकेत आहेत. मलिंगाने आतापर्यंत मुंबई इंडियन्सतर्फे 122 सामने खेळले असून त्यात 177 बळी घेतले आहेत. गतवर्षी मुंबईने चौथ्यांदा आयपीएल स्पर्धा जिंकली, त्यात मलिंगाच्या भेदक गोलंदाजीचा प्रामुख्याने वाटा राहिला होता.
आरसीबीच्या कर्णधारपदी विराट कोहलीच कायम
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाला अनुक्रमे 5 वे, 7 वे, तिसरे, उपजेतेपद, 8 वे, 6 वे व पुन्हा 8 वे अशा कामगिरीवर समाधान मानावे लागले असले तरी यंदाही विराटच आपल्या संघाचा कर्णधार असेल, असे आरसीबी व्यवस्थापनाने शुक्रवारी स्पष्ट केले. आतापर्यंत विराटने आयपीएलमध्ये आरसीबीचे सातवेळा नेतृत्व केले असून त्यापैकी दोनच वेळा संघाला प्ले-ऑफपर्यंत मजल मारता आली आहे. 2013 मध्ये विराटने नेतृत्व स्वीकारण्यापूर्वी 5 हंगामात मात्र त्यांनी दोनवेळा अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. आरसीबीचे चेअरमन संजीव चौरीवाला यांनी विराटच्या नेतृत्वावर शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
इंग्लंड-ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना क्वॉरन्टाईनची सक्ती नाही
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे आयपीएलमधील करारबद्ध खेळाडू बायो बबलमधूनच युएईत दाखल होत असल्याने त्यांनी क्वॉरन्टाईन होण्याची सक्ती नसेल, असे आरसीबीचे अध्यक्ष संजीव चौरीवाला यांनी स्पष्ट केले. अर्थात, याबद्दलचा अंतिम निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.