मार्केटयार्डात सौदा, नवीन हळदीच्या दराकडे लक्ष
सांगली / प्रतिनिधी
मार्केटयार्डात बुधवारी झालेल्या हळद सौद्यामध्ये राजापुरी हळदीला क्विंटलला 18 हजार रुपये उच्चांकी दर मिळाला आहे. चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान जानेवारीच्या मध्यानंतर नवीन हळद विकीस येण्याची शक्यता असून या हळदीच्या दराकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
मार्केटयार्डात हळदीची प्रत्येकवर्षी मोठया प्रमाणात आवक होते. यंदाच्या हंगामामध्येही आवक मोठया प्रमाणात होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नवीन हळद येण्यास अद्याप पंधरा-वीस दिवसांचा अवधी असला तरी मागील हंगामातील शिल्लक असलेल्या हळदीचे सौदे यार्डात सुरूच आहेत. बुधवारी काढण्यात आलेल्या सौद्यात वाळवा तालुक्यातील बावची येथील विजयकुमार चव्हाण या शेतकऱ्याच्या राजापूरी जातीच्या हळदीला क्विंटलला विक्रमी 18 हजार रुपये इतका दर मिळाला. हळद सौद्यामध्ये क्विंटलला कमीत कमी सहा तर जास्तीत जास्त 18 हजार व सरासरी 12 हजार रुपये असा दर मिळाला आहे. यार्डातील दिलीप आरवाडे यांच्या दुकानात हा सौदा निघाला.
येथील मार्केटयार्डात हळद खरेदीसाठी राज्यभरातून मोठय़ा प्रमाणात व्यापारी येतात. परिणामी हळदीस चांगला दर मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू शकणार आहेत. मागील हंगामातील हळद संपत आली असून या हंगामात सरासरी सात ते दहा हजार इतके दर राहिले. नवीन हंगाम लवकरच सुरू होणार असल्याने या हंगामात दर किती राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. दरम्यान त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी आपली जास्तीत जास्त हळद विक्रीसाठी यार्डात आणून फायदा घ्यावा, असे आवाहन सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांनी केले आहे. या हंगामामध्ये हळद आणि बेदाणा या शेतीमालावर शासनाची तारण कर्ज योजनाही सुरू आहे, त्यांचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी यावेळी सांगितले.