उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या प्रकाशन संस्थेसह पीरवाडीतील निवासस्थानाची झडती : तब्बल अकरा तास तपासणी : महत्वाची कागदपत्रेही ताब्यात : राजकीय वर्तुळात खळबळ
प्रतिनिधी/कोल्हापूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भगिनी विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिशिंग हाऊसच्या येथील कार्यालय आणि पीरवाडी (ता. करवीर) येथील निवासस्थानावर गुरूवारी आयकर विभागाने छापे टाकून चौकशी केली. सकाळी सहा वाजता सुरू झालेली चौकशीची प्रक्रिया सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहिली. अकरा तासांच्या या प्रक्रियेत आयकरच्या अधिकाऱयांनी महत्वाची कागदपत्रे आणि कॉम्प्युटरमधीही डाटा ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, विजया पाटील या ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुतणी आहेत. त्यांच्यावर छापे पडल्याच्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या पवार परिवारातील नातेवाईकांवर आयकर विभागाने गुरूवारी एकाचवेळी छापे टाकले. यामध्ये अजित पवार यांच्या पुण्यातील एका बहिणीचाही समावेश आहे. विजया पाटील यांचे कोल्हापुरात मुक्त पब्लिशिंग हाऊस नामक पुस्तक प्रकाशन संस्था आहे. राजारामपुरी आठवी गल्लीतील एका कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये या संस्थेचे कार्यालय आहे. विजया पाटील या करवीर तालुक्यातील पीरवाडी येथे राहतात. तेथे त्यांचे निवासस्थान आणि फार्महाऊस असल्याचे सांगितले जाते.
सकाळी सहा वाजता छापे टाकण्यास प्रारंभ
आयकर विभागाच्या अधिकारी गुरूवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास विजया पाटील यांच्या राजारामपुरीतील मुक्ता पब्लिशिंगचे कार्यालय आणि पीरवाडीतील निवासस्थान येइाs एकाचवेळी छापे टाकले. आयकरच्या पुणे विभागाचे अधिकारी राजारामपुरीतील कार्यालयात दाखल झाले. त्याआधी पाटील यांना छापा टाकण्यात येणार असल्याबद्दलची कल्पना अधिकाऱयांनी दिली. तसेच कार्यालयाच्या किल्ल्यांची मागणी केली. यावेळी कार्यालयातील चार कर्मचाऱयांच्या उपस्थितीत आयकरच्या अधिकाऱयांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन तपासणी सुरू केली. तसेच कॉम्प्युटरमधील डाटाही ताब्यात घेतला. सायंकाळी पाचवाजेपर्यंत चौकशीची प्रक्रिया सुरू होती. आयकरचे अधिकारी कागदपत्रानुसार कार्यालयीन कर्मचाऱयांकडून माहिती घेत होते.
राजारामपुरीतील कार्यालयात छापा टाकून चौकशी सुरू झाली तेंव्हाच आयकरच्या मुंबई विभागातील अधिकाऱयांनी पीरवाडीतील निवासस्थानी छापे टाकून चौकशी तेथेही महत्वाची माहिती घेऊन कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. एकाचवेळी टाकण्यात आलेल्या या छाप्यांची नंतर जिल्हÎासह राज्यभर चर्चा होती.
विजया पाटील अनुपस्थित
छापे टाकून कागदपत्रे तपासणी सुरू असताना विजया पाटील उपस्थिती नव्हत्या. प्रतिक्रियेसाठी त्यांचा संपर्क होऊ शकला नी.
राजारामपुरी, पीरवाडीत कमालीची गुप्तता
आयकर विभागाने छापे टाकताना कमालीची गुप्तता पाळली. सीआरपीएफसारख्या जवनांची कारवाईवेळी मदत घेण्यात आली. त्यांना कार्यालय, निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. राजारामपुरीत छाप्याची कारवाई सुरू असताना कमर्शियल कॉम्प्लेक्समधील इतर दुकाने, कार्यालयातील व्यवहार नेहमीसारखे सुरू होते. कोणालाही छापे पडल्याची साधी कल्पनाही नव्हती. तशीच स्थिती पीरवाडीतील कारवाईवेळी होती.
आठ अधिकाऱयांचा सहभाग
छापे टाकण्याच्या कारवाईत पुणे विभागातील चार आणि मुंबई विभागातील चार असे आठ अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी कारवाईबाबत प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया अथवा माहिती देण्यास नकार दिला.