केंद्र सरकारकडून सहा राज्यांसाठी 4,381 कोटी रुपयांची मदत जाहीर : महाराष्ट्राला केवळ 268 कोटी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनांमुळे प्रभावित राज्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखालील उच्चस्तरीय समितीने निधी मंजूर केला आहे. या राज्यांमध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, कर्नाटक, मध्यप्रदेश आणि सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांना एकूण 4,381.88 कोटींचा निधी देण्यात आला आहे.
चालू वर्षात चक्रीवादळ, पूर आणि भूस्खलनामुळे अनेक राज्यांमध्ये मोठे आर्थिक नुकसान आणि पडझड झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात उच्चस्तरीय आयोगाने (एचएलसी) राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी, एनडीआरएफ अंतर्गत सहा राज्यांना अतिरिक्त केंद्रीय साहाय्य मंजूर केले आहे. चक्रीवादळग्रस्त पश्चिम बंगालला 2,707.77 कोटी तर ओडिशाला 128.23 कोटी रुपये देण्यात आले आहेत. त्याचबरोबर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीसाठी महाराष्ट्राला 268.59 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
महाराष्ट्राला तुटपुंजी मदत
महाराष्ट्र सरकारने निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईपोटी 1,065 कोटी रुपयांची मागणी केंद्राकडे केली होती. मात्र, केंद्र सरकारने मागणीपैकी केवळ 30 टक्के निधी देण्याची तयारी दर्शविल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्राला अवघे 268 कोटी 59 लाख मंजूर करण्यात आले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राला तटपुंजी मदत जाहीर झाली आहे.
पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत
‘अम्फान’ वादळाचा सामना करणाऱया पश्चिम बंगालला सर्वाधिक मदत जाहीर करण्यात आली आहे. 4381.88 पैकी 2707.77 कोटी रुपये पश्चिम बंगालला देण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2020 रोजी पश्चिम बंगाल आणि ओडिशा या बाधित राज्यांचा दौरा केला. अम्फानच्या चक्रीवादळाच्या दुर्घटनेनंतर पश्चिम बंगालला 1000 कोटी आणि ओडिशाला 500 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर ही आर्थिक मदत 23 मे रोजी देण्यात आली होती.
कर्नाटकासाठी 577.84 कोटी रुपये, मध्यप्रदेशला 611.61 कोटी रुपये आणि सिक्कीमला 87.84 कोटी रुपये दिले जातील. 2020-21 या आर्थिक वर्षात आजपर्यंत केंद्र सरकारने एसडीआरएफकडून 28 राज्यांना 15,524.43 कोटी रुपये दिले आहेत.
राज्यनिहाय मदतीची रक्कम…
प. बंगाल 2,707.77 कोटी
मध्यप्रदेश 611.61 कोटी
कर्नाटक . 577.84 कोटी
महाराष्ट्र 268.59 कोटी
ओडिशा . 128.23 कोटी
सिक्कीम 87.84 कोटी