विविध रंगांसह पिचकाऱयांनी बाजारपेठा सजल्या 26 रोजी पणजीत चित्ररथ मिरवणूक
प्रतिनिधी/पणजी
राज्यातील होळी उत्सव आज गुरुवार दि. 17 मार्चपासून सुरू होत असून उद्या शुक्रवार दि. 18 मार्च रोजी रंगपंचमी म्हणजे धुलिवंदन साजरे करण्यात येणार आहे. गोव्यात सर्वत्र त्याची तयारी चालू असून बाजारपेठा विविध रंगांनी, पिचकाऱयांनी सजलेल्या दिसून येत आहेत. कोरोनाचा संसर्ग आता संपल्यात जमा असल्यने यंदा होळी धुमधडाक्यात साजरी करण्यात येणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. गोव्यातील पारंपरिक शिमगोत्सव व चित्ररथ मिरवणूका देखील विविध शहरातून होणार आहेत.
गोव्यातील विविध गावात विविध पद्धतीने होळी साजरी होते. गेली दोन वर्षे म्हणजे 2020, 2021 मध्ये कोरोनाचा संसर्ग कमी जास्त प्रमाणात चालू राहिल्याने होळी उत्साहात साजरी करणे लोकांना शक्य झाले नव्हते. परंतु आता कोरोनाची भीती संपल्यामुळे जनता उत्साहित झाल्याचे दिसून येत आहे.
काही गावात यापूर्वीच होळी उत्सव सुरू झाला असून तो आता संपण्याच्या मार्गावर आहे, तर काही गावात तो सुरू होणार आहे. वेगवेगळय़ा दिवसांचा हा उत्सव विविध गावात साजरा होतो. त्यात चोर, घोडेमोडणी, कौल, अवसर, गडे असे विविध प्रकार समाविष्ट आहेत. हे सर्व प्रकार यंदा मोठय़ा उत्साहात साजरे करण्याची तयारी दिसून येत आहे.
पुढील शनिवारी म्हणजे 26 मार्च रोजी पणजीत चित्ररथ मिरवणूक काढण्यात येणार असून म्हापसा, मडगाव, वास्को, फोंडा व इतर ठिकाणी देखील मिरवणुका होणार असल्याचे सांगण्यात आले. होळी उत्सवासाठी विविध गावात पारंपरिक पद्धतीने सज्जता करण्यात आली असून आज गुरुवारी रात्री होळी पेटवून शिमगोत्सवाचा शुभारंभ करण्यात येणार आहे.