आठवडाभरात तब्बल 252 संसर्गबाधितांची भर
प्रतिनिधी/ .बेंगळूर
राज्यात कोरोनाचा विषाणूचा स्फोट झाला असून मागील 24 तासांत तब्बल 63 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बागलकोट जिल्हय़ात 15, दावणगेरेत 12, धारवाड जिल्हय़ात 9, कोलार आणि हासनमध्ये प्रत्येकी 5, बेंगळूर शहर जिल्हय़ात 4, गदगमध्ये 3, बिदर, यादगिर, मंगळूर जिल्हय़ांत प्रत्येकी 2, गुलबर्गा, चिक्कबळ्ळापूर, बळ्ळारी आणि मंडय़ा जिल्हय़ात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मंगळवारी पॉझिटिव्ह आढळून आलेल्यांपैकी अनेक जण परजिल्हय़ातून आलेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या 925 वर जाऊन पोहोचली आहे. मागील आठवडाभरात राज्यात तब्बल 252 नव्या रुग्णांची भर पडली आहे.
लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर परराज्यातून कामगारांचे लोंढेच्या लोंढे कर्नाटकात दाखल होत आहेत. मुंबई, अहमदाबाद, अजमेरमधून परतलेल्यांपासून कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढत आहे. हासनमध्ये मुंबईहून परतलेल्या 5 जणांना मंगळवारी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा समावेश आहे. सेवा सिंधू पासद्वारे हे सर्वजण भाडोत्री कारने 10 मे रोजी हासनमध्ये आले. अरसिकेरे चेकपोस्टवर त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून आली. नंतर त्यांना त्वरित चन्नरायपट्टण येथील मोरारजी देसाई वसती शाळेत क्वारंटाईन करण्यात आले.
कोलार जिल्हय़ातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. आतापर्यंत कोरोनामुक्त असणाऱया या जिल्हय़ात मंगळवारी अचानक 5 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यादगिर, मंडय़ा, बागलकोट, धारवाड, हासन, गदग दावणगेरे जिल्हय़ांमध्येही अहमदाबाद, मुंबई, ओडिशा, चेन्नईहून परतलेल्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.
यादगिरमध्ये अहमदाबादमधून आलेल्या दोघांना, मंडय़ा येथे मुंबईवरून आलेल्या एकाला, बागलकोटमध्ये अहमदाबादमधून आलेल्या 15 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्याचप्रमाणे धारवाड जिल्हय़ात अहमदाबादवरून परतलेल्या 12 जणांना तर गदगमधील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यात एकाच दिवशी तब्बल 63 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर केवळ 7 रुग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. त्यामधील बोगलकोटचे सहा आणि विजापूरमधील एकाचा समावेश आहे.
बेंगळूरमध्ये सर्वाधिक 182 रुग्ण
राज्यात आतापर्यंत 925 कोरोनाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 433 जण आतापर्यंत बरे झाले आहेत. तर 460 जणांवर विविध इस्पितळांमध्ये उपचार सुरू असून 7 जण व्हेंटिलेटरवर आहेत. 31 जणांचा बळी गेला आहे. तर एकाने आत्महत्या केली आहे. बेंगळूर शहर जिल्हय़ात सर्वाधित 182 रुग्ण आढळले असून हा जिल्हा रुग्णसंख्येत पहिल्या स्थानी आहे. बेळगाव जिल्हा 107 रुग्णांसह दुसऱया क्रमांकावर तर 88 रुग्णांसह म्हैसूर जिल्हा तिसऱया, 83 रुग्णांसह दावणगेरे जिल्हा चौथ्या स्थानावर आहे. गुलबर्गा जिल्हा 73 रुग्णांसह पाचव्या स्थानी आहे.
बेंगळुरात कोरोनाबाधित व्यक्ती बेपत्ता
कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावामुळे आरोग्य खात्याची चिंता वाढली असतानाच बेंगळूरच्या बोम्मनहळ्ळी येथे कोरोनाबाधित रुग्ण बेपत्ता झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. बेंगळूरमध्ये 7 तबलिगींचे मोबाईल स्वीच ऑफ असून त्यांचा अद्याप थांगपत्ता लागलेला नाही. अशातच कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण बेपत्ता असल्याने धोका आणखी वाढला आहे. बोम्मनहळ्ळी येथील एक व्यक्ती कोरोनाची लक्षण आढळून आल्याने तपासणीसाठी गेली. त्या व्यक्तीच्या स्वॅबचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ही बाब समजताच त्या व्यक्तीने बेंगळूर महापालिकेचे कर्मचारी, आरोग्य अधिकाऱयांची नजर चुकवून पलायन केले आहे. त्याचा शोध जारी आहे.