- गोव्यातील एकूण कोरोनाबाधित 51
- सध्या उपचार घेणारे कोरोनाबाधित 44
- यापूर्वी पूर्णपणे बरे झालेले रुग्ण 7
प्रतिनिधी / मडगाव
पुण्यातून आलेली एक विद्यार्थिनी, गोव्यातून कारवारकडे जाणारी तटरक्षक दलातील एक व्यक्ती, रेल्वेतून आलेले दोघेजण आणि इटलीतून आलेल्या खलाशांपैकी एक मिळून काल बुधवारी पाच कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील चार जणांना मडगावच्या कोविड-19हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. काल बुधवारपर्यंत गोव्यात सध्या उपचार घेणाऱया कोरानाबाधितांची संख्या 44 झाली आहे. त्याशिवाय दीड महिन्यापूर्वी 7 रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.
राजधानी एक्सप्रेस बंद केली तरी खाजगी वाहनातून अनेक जण गोव्यात प्रवेश करीत आहे. त्यात अनेक गोमंतकीय आहेत. चेकनाक्यावर त्याची जलद चाचणी घेतली जाते व त्यात पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्यास नंतर गोमेकॉत पुन्हा अंतिम चाचणी घेतली जाते. गोमेकॉतील चाचणी पॉझिटिव्ह निघाली तर उपचारासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते.
पुण्यातून आलेली विद्यार्थीनी कोरोनाबाधित
पुण्यातून आलेली एक विद्यार्थिनी खाजगी वाहनाने गोव्यात आली होती. ती कोरोना संक्रमित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तटरक्षक दलातील काही व्यक्ती गोव्यातून कारवारकडे जात असताना, त्यांची तपासणी केली असता त्यातील एक व्यक्ती संक्रमित निघाली. त्याच बरोबर अन्य दोघे मिळून बुधवारची संख्या चार पोचली होती.
काल बुधवारी ईटलीहून खास विमान गोव्यात आले. त्यात जलद चाचणीत एक व्यक्ती पॉझिटिव्ह सापडली आहे. अद्याप या व्यक्तीचा गोमेकॉतील अहवाल येणे बाकी असून त्यानंतरच या व्यक्ती संदर्भात पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सद्या कोरोना नमुन्याची चाचणी घेण्यासाठी गर्दी होत आहे. मडगावच्या जिल्हा इस्पितळाबाहेर पोलीस तैनात करण्यात आले असून चाचणीसाठी येणाऱया व्यक्तीनी गोंधळ घालू नये किंवा तेथून पळून जाऊ नये यासाठी दक्षता घेतली जात आहे.
कोविड इस्पितळाची क्षमता 220 बेडपर्यंत वाढविणार आरोग्य सचिव निला मोहनन यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
मडगाव येथील कोविड इस्पितळाची क्षमता 220 बेडपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य सचिव निला मोहनन यांनी दिली आहे. यापुर्वी ती क्षमता 100 होती ती 170 पर्यंत वाढविण्यात आली असून ती पुढे 220 पर्यंत सर्व सोईंनी सुसज्ज करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गोव्यात विविध मार्गाने येणाऱया सर्व प्रवाशांची कोविड चाचणी व विलगीकरण होत असल्याचे त्यांनी सांगितले. गोमेकॉतील व्हायरोलॉजी लॅब 24 तास सुरू असून तेथे कोरोना नमुण्याची तपासणी केली जाते, असेही त्यांनी नमूद केले.
माहिती खात्याचे सचिव संजयकुमार म्हणाले की, इटली देशातून दोन विमानातून प्रत्येकी 168 खलाशी गोव्यात आले असून त्यांची कोरोना चाचणी चालू आहे. गोव्यात 29 एप्रिलनंतर सुमारे 13860 जणांची परत पाठवणी करण्यात आली. अजुनही अनेकजण आपआपल्या राज्यात जाण्याच्या प्रतीक्षेत असून त्यांच्यासाठी रेल्वेची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गोवाच्या सीमेवर काम करणाऱया सर्वांसाठी सुरक्षा कवच देण्याचे काम सुरू असल्याची माहिती कुमार यांनी दिली.