प्रतिनिधी /पणजी
राज्यातील विविध शिवमंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठय़ा उत्साहात पारंपारीक पध्दतीने साजरा करण्यात आला. श्रींचे दर्शन घेऊन पिंडीवर अभिषेक करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आपले. काही मंदिरात पहाटे 5 वाजल्यापासून भाविकांनी रांगा लावल्या होत्या. दर्शन व अभिषेक करण्यासाठी दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांची गर्दी दिसून येत होती. बहुतेक शिवमंदिरात भाविकांनी शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केला.
शिवरात्री निमित्त अनेक शिवमंदिरात विविध धार्मिक विधी करण्यात आले. काही मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तर अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. काही मंदिरात संगित, दशावतारी नाटकांचे आयोजन करण्यात आले होते.