कोरोना कर्फ्यूचेच नियम 24 मे पर्यंत जारी -प्रवासी, खासगी वाहने रस्त्यावर आणण्यास प्रतिबंध
प्रतिनिधी/ .बेंगळूर
राज्यात कोरोना नियंत्रणासाठी जारी करण्यात आलेला कोरोना कर्फ्यू अयशस्वी ठरल्याने शुक्रवारी रात्री राज्य सरकारने अखेर 14 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. सोमवार दि. 10 मे रोजी सकाळी 6 पासून ते 24 मे रोजी सकाळी 6 पर्यंत हा लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार यांनी यासंबंधीची नवी मार्गसूची जारी केली आहे. त्यानुसार केवळ अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली असून खासगी वाहनांच्या वर्दळीवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी 26 एप्रिल रोजी मार्गसूची जारी करून 12 मेपर्यंत कोरोना कर्फ्यू जारी करण्यात आला होता. मात्र, नागरिकांकडून नियम धाब्यावर बसविण्यात येत असल्याने आणि कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने सरकारने आणखी कठोर नियम जारी करत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. आरोग्य सेवा, औwषध, बांधकाम क्षेत्र, दूधविक्री, विवाह समारंभ, मालवाहतूक, रेल्वे, विमानसेवा वगळता सर्व क्षेत्रांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सोमवारपासून 14 दिवस संपूर्ण राज्य स्तब्ध होणार आहे.
वाहने रस्त्यावर उतरविण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. अत्यावश्यक वस्तू आणण्यासाठी देखील वाहनांचा वापर करू नये. त्यासाठी चालतच जावे लागणार आहे. रुग्णांना इस्पितळात नेण्यासाठी आणि घरी आणण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करण्यास मुभा देण्यात आली आहे. मालवाहतूकीलाही परवानगी देण्यात आली आहे. अनावश्यकपणे वाहने घेऊन रस्त्यावर उतरणाऱयांना दंडात्मक कारवाईबरोबरच जप्तीची कारवाई केली जाणार आहे. तिकीट असेल तरच रेल्व, विमान प्रवासाची तिकिटे असतील तरच वाहने वापरता येणार आहे. बस, मेट्रो रेल्वे, खासगी प्रवासी वाहनसेवा बंद ठेवण्याचा आदेश सरकारने दिला आहे. मात्र, तातडीच्या प्रसंगीच टॅक्सी, ऑटोरिक्षा रस्त्यावर आणता येतील.
भाजीपाला, फळे विक्रीसाठी मुभा असली तर सकाळी 6 ते 10 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. हातगाडीवर घरपोच भाजी-फळेवक्री, दुधाचे बूथ सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. कृषी, कृषी उपकरणे विक्री, दुग्धोत्पादन व संबंधित क्षेत्राला सकाळी 6 ते 10 या कालावधीपर्यंतच सूट देण्यात आली आहे. बँका, पतसंस्था सुरु राहणार आहे. अत्यावश्यक सेवा पुरवणारी सरकारी कार्यालये सुरू राहतील. उर्वरित कार्यालयांमध्ये 50 टक्के कर्मचाऱयांचीच उपस्थिती असावी, असा आदेश देण्यात आला आहे.
विवाह समारंभांना हिरवा कंदील
कोरोना कर्फ्यू कालावधीत दिलेल्या परवानगीप्रमाणेच लॉकडाऊन कालावधीतही विवाह समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये केवळ 50 जणांच्या उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करणाऱयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासह मोठय़ा प्रमाणात दंड वसूल केला जाणार आहे. अंत्यससंस्कारात 5 जणांना सहभागी होता येणार आहे.
धार्मिक स्थळेही बंदच
लोक एकत्र येऊन कोरोनाचा फैलाव होण्याचा धोका अधिक असल्याने मठ-मंदिरे, चर्च, मशिदींसह सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे.
बांधकामे, कारखाने सुरू, पण स्थानिक कामगारांनाच मुभा
बांधकामेही सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तर बांधकाम सुरू असणाऱया ठिकाणीच असणाऱया कर्मचाऱयांना कामे सुरू ठेवता येणार आहेत. रस्ते निर्मिती आणि दुरुस्तीकामेही सुरु ठेवता येणार आहेत. आयटी आणि आयटीइएस कंपन्यांमधील अत्यावशक कर्मचाऱयांनाच कंपनीत जाण्याची मुभा आहे. तर उर्वरित कर्मचाऱयांनी घरातूनच काम करावे. दूरसंपर्क, इंटरनेट सेवा, प्रसारमाध्यमे, केबल सेवा सुरु राहणार आहेत. स्थानिक कामगार व मनुष्यबळाचा वापर करून उत्पादन आधारित कारखाने सुरू ठेवता येतील. या कर्मचाऱयांना ओळखपत्राची सक्ती असणार आहे.
बॉक्स…
सकाळी 6 ते 10 पर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमधून पार्सल आणण्यास मुभा असली तरी त्यासाठी ग्राहकांना वाहनांचा वापर करता येणार नाही. पार्सल चालतच जावे लागणार आहे. तर येथील पदार्थ होम डिलिव्हरी पद्धतीने घरपोच देण्याची मुभा असून हॉटेल कर्मचाऱयांना यासाठी वाहन वापरता येणार आहे. सरकारला महसूल मिळावा या उद्देशाने बार, मद्यविक्रीची दुकाने सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मद्य दुकाने सकाळी 6 ते 10 या कालावधीतच सुरु ठेवण्यास परवानगी असणार आहे. बारमध्ये बसून मद्यप्राशन करता येणार नाही. केवळ पार्सल घेऊन जाता येणार आहे.
बॉक्स….
कोरोना महामारीच्या काळात आरोग्य सेवा पूर्णपणे सुरू राहणार आहेत. मेडिकल, हॉस्पिटल, नर्सिंग होम, लॅबोरेटरिज वैद्यकीय महाविद्यायांमधील वैद्यकीय सेवा, गॅस पुरवठा, वीज पुरवठा, सुरक्षा व्यवस्थेला परवानगी देण्यात आली आहे. येथील कर्मचाऱयांना खासगी वाहने वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
बॉक्स…..
@ काय सुरु…
बँका, एटीएम, सरकारी कार्यालये (अंशतः)
किराणा दुकाने, भाजी, फळे विक्री (स. 6 ते 10)
हातगाडीवर भाजी-फळविक्री सायं. 6 पर्यंत
दूधविक्री सायंकाळी 6 पर्यंत
रेशन दुकाने किराणा दुकाने (मर्यादीत वेळेत)
विवाह समारंभ (50 जणांची उपस्थिती)
हॉस्पिटल, नर्सिंग होम, मेडिकल
बांधकामे, रस्तेनिर्मिती, दुरुस्तीकामे
आवश्यक मालवाहतूक
रेल्वे, विमानप्रवास
हॉटेल, रेस्टॉरंट-पार्सल किंवा होम डिलिव्हरी
मद्यविक्री ः सकाळी 6 ते 10 पार्सल
कृषी व दुग्धोत्पादन, मत्स्योद्योग, कुक्कुटपालन
कारखान्यांमध्ये स्थानिक कामगारांचा वापर
@ काय बंद…
बस, ऑटोरिक्षा, कॅब, टॅक्सी
आंतर जिल्हा प्रवास
शाळा-कॉलेज, कोचिंग सेंटर
स्विमींग पूल, मैदाने, गार्डन, क्लब, जीम, मॉल
सभा-समारंभ, धार्मिक कार्यक्रम
मठ-मंदिरे, चर्च, मशिदसह सर्व धार्मिक स्थळे
चित्रपटगृहे, मनोरंजन पार्क,
स्पा, सलून, ब्युटी पार्लर