प्रतिनिधी /पणजी
बंगालच्या खाडीत नव्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून कदाचित त्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊ शकते, मात्र त्याचा प्रभाव पश्चिमेच्या दिशेने होत असून येत्या दि. 12 व 13 नोव्हेंबर रोजी गोव्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याने यासंदर्भात गोव्यात येलो अलर्ट जारी केला आहे. पाऊस एकदाचा गेला या अविर्भावात गोमंतकीय जनता होती. पावणेदहा महिने गोव्यात पाऊस कोसळल्यानंतर आता हळूहळू हिवाळ्याचे दिवस सुरू होतील, असा अंदाज फ्ढाsल ठरला आहे. पाऊस पुन्हा गोव्यात मार्गक्रमण करण्याच्या तयारीत आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू वादळात रूपांतर होण्याच्या तयारीत आहे. हवामान खात्याने बंगाल, ओडिसा आणि आंध्रप्रदेशला सावध राहण्यास सांगितले आहे. कमी दाबाच्या पट्टयाचे नेमके कितपत वादळात रुपांतर होईल हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल. तथापि त्याचा प्रभाव वाढू लागला असून गोव्यात येत्या दि. 12 व 13 रोजी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. हवामान खात्याने केवळ या दोन दिवसांचा अंदाज जरी वर्तविला असला तरी देखील पावसाचे हे प्रमाण आणखी दोन दिवस वाढू शकते. यासंदर्भातील सविस्तर माहिती हवामान खाते पुढील दोन दिवसांत देईल. पावसाच्या एकंदरित हालचालीवर हवामान खाते बारकाईने लक्ष ठेवत आहे.