ऑनलाईन टीम / मुंबई :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील आता महाराष्ट्र राज्यातील जिम उघडण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितनुसार, सुप्रिया सुळे यांच्याकडे रामदास इंगळे या खेळाडूने पत्राद्वारे जिम उघडण्याची मागणी केली आहे. तेच पत्र ट्विटरवर शेअर करत सुप्रिया सुळे यांनी देखील जिम उघडण्याची मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे आपल्या ट्विट मध्ये म्हणाल्या की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील जिम अजूनही बंद आहेत. पण आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. तसेच राज्यातील अनेक जिम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, त्यामुळे आता जिम सुरू करण्यात यावीत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याआधी काही जिम मालक आणि बॉडीबिल्डर्सनी राज ठाकरे यांची भेट घेऊन ठाकरे सरकारकडे जिम सुरु करण्याचा मुद्दा उचलून धरण्याची विनंती केली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी, तुम्ही जिम ओपन करा, बघू काय होतं असा सल्ला दिला होता. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे पत्राद्वारे जिम सुरू करण्याबाबत मागणी केली होती.