राधानगरी / प्रतिनिधी
जबरदस्त इच्छा शक्ती व अपार मेहनतीने यश खेचून आणणारी राधानगरीची पैलवान आलीशा अशोक कांबळे हिची हरियाणा येथील, भिवानी येथे होणाऱ्या ऑल इंडीया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. लहानपणी पासून शालेय जीवनात कुस्तीची आवड निर्माण झाल्यापासून तिने आतापर्यंत अनेक कुस्ती स्पर्धत भाग घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर गेल्या महिन्यात सातारा येथे आयोजित कोल्हापूर शहर संघाचे प्रतिनिधित्व करून 55 किलो वजनी गटात कांस्य पदक मिळवून राधानगरीसह कोल्हापूर जिल्हाचे नावलौकिक केले आहे.
कुस्ती खेळाडू होणे म्हणजे फार खर्चिक बाब आहे, आणि ते सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंना न परवडणारे आहे, महिला कुस्तीपटू आलिशाने घरची आर्थिक परिस्थिती बेताची असताना देखील, वैयक्तीक कामगिरीच्या जोरावर आलीशा कांबळे हिने आपल्या नावाने वेगळे असे अस्तित्व निर्माण केले आहे.
१५ ते १७ जानेवारीला हरियाणा येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धसाठी ५५ किलो गटातून तिची नुकतीच निवड झाली आहे. ती सध्या पुणे येथील सह्याद्री कुस्ती संकुलला सराव करत आहे. तसेच एस.एन.डी.टी. कला वाणीज्य महिला महाविद्यालय पुणे येथे शिक्षण घेत आहे. यासाठी तीला या कुस्ती संकुलाचे संस्थापक विजय बराटे, NIS कुस्ती कोच संदिप पटारे, माधुरी घराळ, कोल्हापूर जिल्हा तालीम संघाचे प्रकाश खोत, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.माधवी कुलकर्णी, प्रा. राधिका राऊत, दिलीप पडवळ, निलेश पाटील, परिक्षीत पाटील, संजय दाबाडे, प्रल्हाद जाधव,वडील अशोक व आई सपना यांचे मार्गदर्शन लाभले.