प्रतिनिधी / राशिवडे
कोदवडे- वाघवडे-मोहडे ( ता. राधानगरी) या गावांदरम्यान नव्याने केलेल्या १ कोटी ३५ लाखाच्या मुख्यमंत्री सडक योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कोदवडे, वाघवडे, मोहडे ग्रामस्थांनी आमदार प्रकाश आबीटकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या दर्जाहीन रस्त्याची पुणे येथील राज्य गुणवत्ता समन्वयक एम. बी. उगले, आमदार प्रकाशराव आबिटकर, या विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणी पत्रकार यांच्या उपस्थित सुमारे दहा तास कामाची पहाणी करत विविध तपासण्या केल्या.
या दर्जाहीन कामाची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्याची मागणीही खुद्द आमदार आबीकटर यांनीही केली आहे. रस्त्याचा कामाबाबत सुरूवातीपासूनच स्थानिक ग्रामस्थातुन अनेक तक्रारी होत्या. आमदार आबिटकर यांनी या विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एस.कुलकर्णी व उपअभियंता एस. ए.गायकवाड यांनी पाहणी केली असता सदर कामात किरकोळ त्रुटी असल्याचे अधिकार्यांनी मान्य केले. तर ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पुर्ण निकृष्ट असल्याचे दाखवून दिले. या दर्जाहीन रस्त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार आबिटकर यांनी मुख्यअभियंता मुख्यमंत्री सडक योजना यांच्याकडे केली होती.
आमदार आबिटकर यांच्या तक्रारीनंतर शनिवारी राज्य गुणवत्ता समन्वयक एम. बी. उगले यांनी अवघ्या दोन किमी रस्त्याची सुमारे आठ तास पहाणी केली. शनिवारी सकाळी बारा वाजलेपासुन राज्य गुणवता नियंत्रक एम.बी उगले यांनी रस्त्या, गटर, पुल आदी कामाची पहाणी केली. यामध्ये विविध त्रुटी आढळुन आल्या. दरम्यान डांबर टक्केवारी, केंबर स्लोप, रस्ता थर जाडी, खडी ग्रेडेशन आदी चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये कामाची गुणवता खालावल्याचे निदर्शनास आले तर साहित्य निक्रष्ट असल्याचेही आढळले. सी. डी. वर्क मोहरी तपासणी करण्यात आली. यामध्ये दगडे टाकल्याचे निदर्शनास आले, याबाबत ग्रामस्थांनी चित्रफित दाखविल्यानंतर मोहरी निक्रष्ठ झाल्याचे मान्य करुन हे काम परत करण्याचेमान्य केले. यादम्यान मुख्यमंत्री सडक योजनेचे मुख्य अभियंता एम. एस. कुलकर्णी, सहाय्यक अभियंता एस. ए. गायकवाड यांना धारेवर धरले. यावेळी कुलकर्णी यांनी कामच दर्जाहीन झाल्याचे मान्य करत कंत्राटदाराला पाठीशी घालणार नाही अशी कबुली दिली.
यावेळी सदाशिव पाटील, माजी उपसरपंच विष्णूपंत बोडके कोदवडे, विष्णुपंत एकशिंगे वाघवडे, शिवाजी कांबळे मोहडे, बंडोपंत वाडकर यांच्यासह, मोहडे, वाघवडे, कोदवडे आदी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.