बांधकाम पुन्हा हाती घेण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमधून समाधान
प्रतिनिधी /बेळगाव
नगरसेवकांच्या सांगण्यावरून महापालिकेने रामदेव गल्ली भंगी बोळातील मुतारी हटविण्याची कारवाई केली होती. मात्र स्थानिक व्यापारी आणि बापट गल्लीतील नागरिकांना आक्षेप घेऊन पाडण्यात आलेली मुतारी पुन्हा बांधण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन मुतारीचे बांधकाम शुक्रवारपासून हाती घेण्यात आले. त्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
नागरिकांना विश्वासात न घेता नगरसेवकाने मुतारी हटविण्याची सूचना महापालिकेच्या अधिकाऱयांना केली होती. त्यामुळे महापालिकेच्यावतीने जेसीबीने सदर मुतारी हटवून जमीनदोस्त केली होती. मुतारी हटविण्यात आल्याची माहिती बापट गल्लीतील रहिवाशांना आणि व्यावसायिकांना मिळाल्यानंतर मुतारी हटविण्यास आक्षेप घेऊन नगरसेवकांच्या कारवाईबाबत संताप व्यक्त केला. तसेच याबाबत महापालिका आणि आमदार अनिल बेनके यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. बापट गल्लीसह परिसरात असलेल्या व्यापारी संकुलातील व्यावसायिकांना तसेच शहरात येणाऱया नागरिकांना ही मुतारी सोयीची आहे. मुतारी नसल्याने भंगीबोळातील रस्त्यावर लघुशंका करीत असतात. त्यामुळे ही मुतारी पुन्हा नव्याने बांधावी अशी मागणी करण्यात आली होती.
या तक्रारीची दखल घेऊन आमदार अनिल बेनपे यांनी मुतारी बांधण्यासाठी निधी देण्याची ग्वाही देऊन बांधकाम करण्यास समत्ती दर्शविली होती. अखेर शुक्रवारी सकाळपासून मुतारी बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. पाडण्यात आलेल्या मुतारीचा ढिगारा हटवून स्वच्छ करण्यात आला. सदर मुतारी हटविण्यात आल्याने व्यावसायिक आणि नागरिकांची गैरसोय झाली आहे. मुतारीचे बांधकाम पुन्हा हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.