आमदार आर. व्ही. देशपांडे यांची माहिती : कोविड संसर्गाबाबत केली अधिकाऱयांशी चर्चा
वार्ताहर / रामनगर
येथील वाढत्या कोविड संसर्गाबाबत आमदार आर. व्ही. देशपांडे यांनी सोमवारी दुपारी 3.30 वाजता रामनगर येथील आंबेडकर भवनात अधिकाऱयांशी चर्चा केली. या चर्चेत जोयडाचे तहसीलदार संजय कांबळे, तालुका वैद्याधिकारी डॉ. सुजाता हुकली, संजय हणबर, विजय पंडित, प्रशांत देशपांडे, सदानंद दबगार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
जोयडा तालुक्यात एकूण 245 कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून 137 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 100 रुग्ण औषधोपचार घेत आहेत. तर 8 रुग्ण दगावले.
शेतकऱयांसाठी बी-बियाणे घेण्याबाबत सकाळी 8 ते 10 पर्यंत, बियाणे केंद्र सुरू राहणार आहेत. तसेच शिंगरगाव शेतकऱयांनी जोयडा येथे बियाणे आणण्यासाठी न जाता त्यांना बियाणे जगलबेट येथे उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देशपांडे यांनी दिली.
रामनगर येथील कित्तूर चन्नम्मा वसती शाळेत कोविड केअर सेंटर बनविण्यात आले आहे. कारण कॅसलरॉक, आखेती, तिनईघाट या भागातील कोविड रुग्णांना जोयडा येथील कोविड सेंटर हे दूर पडत असल्याने रामनगरमध्ये कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.
डॉक्टरांची नियुक्ती करणार
या सेंटरमध्ये सर्वांना स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याची सूचना देशपांडे यांनी तहसीलदारांना केली. तसेच जोयडा येथील एक डॉक्टर या नवीन सुरू करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या बैठकीला विलास गावकर (अनमोड), नामदेव पवार (तिनईघाट), सुहास देसाई (जगलबेट), बळवंत देसाई (जगलबेट) मारुती गावकर, (असू), रामनगर येथील संदीप राणे, विनोद देसाई, दामोदर बांदी आदी मान्यवर उपस्थित होते.