वृत्तसंस्था / अयोध्या
अयोध्येत उभारण्यात येणाऱया भव्य राममंदिरामध्ये अनेक वैशिष्टय़ांसह रामलल्लाच्या गर्भगृहाला सूर्याच्या किरणांनी उजळवून टाकण्याची तयारी आहे. याकरता ओडिशाच्या कोणार्क मंदिरासारखे विशिष्ट तंत्रज्ञान अवलंबिण्याचा विचार करण्यात येत आहे. भगवान रामाच्या मंदिरात प्रत्येक रामनवमीला गर्भगृहात सूर्य किरणांनी रामलल्ला सुशोभित करावे अशा एका प्रस्तावावर काम सुरू असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य कामेश्वर चौपाल यांनी दिली आहे.
राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्यात येईल आणि प्रत्येक रामनवमीवर गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीपर्यंत सूर्याची किरणे थेट पोहोचावीत याकरता काही प्रारुपांवर वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञ तसेच तंत्रज्ञांशी विचारविनिमय सुरू असल्याचे चौपाल म्हणाले.
तज्ञांशी विचारविनिमय
ओडिशातील कोणार्कच्या सूर्य मंदिरात सूर्याची किरणे पोहोचतात. या पार्श्वभूमीवर गर्भगृहापर्यंत किरणे कशी पोहोचावीत याकरता सर्व तांत्रिक पैलू आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर विचार केला जातोय असे त्यांनी सांगितले आहे. मंदिर उभारणीशी संबंधित तांत्रिक पैलूंकरता एक समिती स्थापन करण्यात आली असून यात आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, आयआयटी रुडकी समवेत राष्ट्रीय भवन निर्माण संस्थेचे तज्ञ आणि अन्य तंत्रज्ञ सामील असून त्यांच्याशी सल्लामसलत केली जात असल्याचे न्यासाच्या सदस्याने म्हटले आहे.
मंदिर उभारणी प्रगतिपथावर
श्रीराम मंदिराचे निर्मितीकार्य वेगाने सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत गर्भगृहाची निर्मिती पूर्ण व्हावी आणि लोकांना दर्शन करता यावे अशा दृष्टीने प्रयत्न केला जातोय. त्यापुढील काळात विस्तार तसेच भव्यतेचे काम सुरूच राहणार आहे. पायाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण होणार आहे. अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीदरम्यान भूगर्भीय, भौगोलिक तसेच स्थितीसह अनेक गोष्टींवर लक्ष दिले जातेय.
भूगर्भीय वर्गीकरणानुसार उत्तरप्रदेश भूकंपाच्या संवेदनशील क्षेत्रात मोडतो. मंदिर परिसरानजकी नदीक्षेत्र असून संपूर्ण भाग हिमालयीन क्षेत्राच्या कक्षेत येतो. वैज्ञानिक, खगोलशास्त्रज्ञांशी या सर्व विषयांवर सल्लामसलत केली जात आहे. 15 नोव्हेंबरपासून प्लिंथ (स्तंभाच्या आधाराचा हिस्सा) निर्मिती कार्य सुरू होणार आहे. एप्रिल 2022 पासून प्लिंथवरील स्तंभ तसेच वरील संरचनेची निर्मिती होण्याची अपेक्षा असल्याचे चौपाल यांनी सांगितले आहे.
अन्य सुविधांचीही निर्मिती
मंदिर उभारणीवरून पूर्वीच्या नकाशा तसेच प्रारुपात काही बदल करण्यात आले आहेत. पूर्वीच्या नकाशानुसार दोनमजल्यांची निर्मिती करण्यात येत होती. आता तीन मजल्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. 400 फूट लांबी तसेच 300 फूट रुंदीत प्लिंथची निर्मिती करण्यात येत आहे. त्यावर 365 फूट लांबीचे आणि 235 फूट रुंदीचे 171 फूट उंचीचे मंदिर निर्माण करण्यात येईल. राम मंदिरात एक संग्रहालय, अभिलेख कक्ष, संशोधन केंद्र, सभागृह, गोशाळा, पर्यटन केंद्र, प्रशासकीय भवन, योग केंद्र आणि अन्य सुविधा सामील असतील.