प्रतिनिधी /बेळगाव
मिरवणूक मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया रामलिंगखिंड गल्लीतील रस्त्याशेजारी डेकोरेटिव्ह पथदीपांची उभारणी केली आहे. काही दिवसांपूर्वी पथदीप सुरू करण्यात आले आहेत. मात्र या रस्त्याशेजारी असलेल्या काही खांबांवरील डेकोरेटिव्ह दिवे बंद पडले असून दिव्यांच्या दर्जाबाबत सांशकता उपस्थित करण्यात येत आहे.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचा विकास करून डेकोरेटिव्ह दिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. रामलिंगखिंड गल्लीतील रस्त्यावरून शिवजयंती मिरवणूक तसेच गणेशोत्सव मिरवणूक काढण्यात येते. त्यामुळे मिरवणूक मार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱया रस्त्यावर पथदीप लावण्याची मागणी स्मार्ट सिटीकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन जत्तीमठ ते हेमू कलानी चौकापर्यंतच्या रस्त्यावर डेकोरेटिव्ह पथदीप उभारण्यात आले आहेत. सदर पथदीप काही दिवसांपूर्वीच सुरू केले आहेत. तर या दिव्याच्या खांबावर असलेले आकर्षक विविध रंगांचे दिवे सुरू झाले होते. त्यामुळे हा रस्ता उजाळून निघाला आहे. मात्र काही खांबांवरील डेकोरेटिव्ह दिवे बंद पडले आहेत. पथदीपांच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. पण हे दिवे काही दिवसांतच बंद पडल्याने दिव्यांच्या दर्जाबाबत सांशकता निर्माण झाली आहे.