ऑनलाईन टीम / मुंबई :
मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील नेत्यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. नवाब मलिक यांच्यानंतर आता ईडीने राष्ट्रवादीचे नगरमधील नेते आणि ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागपूर येथील राम गणेश गडकरी साखर कारखान्याची तब्बल 13 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
नागपूरमधील राम गणेश गडकरी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेकडून नाममात्र दरात तनपुरे यांच्याशी संबंधित कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ऑगस्ट 2019 मध्ये यासंदर्भात गुन्हा दाखल केला होता. मागील वर्षी डिसेंबरमध्ये तनपुरे यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरू असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने नागपूरमधील 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ती जमीन जप्त केली आहे. त्याशिवाय अहमदनगरमधील साडेचार एकर जमीन जप्त केली आहे. त्या जागेची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख रुपये इतकी आहे. एकूण 13.41 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.