जिल्हा बँकेत आ. मकरंद पाटील, राजेंद्रशेठ राजपुरे, शिवरुपराजे खर्डेकर बिनविरोध,
प्रतिनिधी/ सातारा
राष्ट्रवादीच्या सत्ताधारी पॅनेलने अर्ज दाखल करायच्या दिवशीच विजयी त्रिशुळचे बिनविरोधचे खाते खोलून विरोधकांना धक्का दिला आहे. त्यामध्ये खरेदी विक्री संघातून आमदार मकरंद पाटील आणि महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी मतदार संघातून राजेंद्र राजपुरे, आणि कृषी प्रक्रिया मतदार संघातून शिवरूपराजे खर्डेकर यांचा समावेश आहे. आमदार मकरंद आबा विजयी झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकच्या आवारात त्यांना उचलून घेत एकच वाघ, आबांचा नाद नाही करायचा कोणी अशा घोषणा देत जल्लोष केला. शिवरुपराजे हे उशिरा बँकेत आले अन् बिनविरोधचा रामराजेंनी त्यांना धक्काच दिला. राजूशेठ राजपुरे हे बिनधास्त निवांत होते. त्यांना आपण बिनविरोध होणार याचे अगोदरच गणित समजले असल्याने ते इतरांच्या घडामोडीवर नजर ठेवून होते. आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी… अर्ज दाखल झाले. उद्या छाननी असून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी चित्र स्पष्ट होणार असले तरीही सत्ताधारी विरुद्ध सर्व समावेश पॅनेल यामध्ये काँटे की टक्कर होणार आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत पॅनेलची सत्ता आली पाहिजे. बँक ताब्यात राहिली पाहिजे. यासाठी राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्ट शब्दात जिह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींना बजावले होते. त्यानुसार विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे यांनी बैठका व चर्चाविनियम करुन पॅनेलची चाचपणी केली. त्यात सुरुवातीलाच आपल्या जागा कुठे बिनविरोध होतात याचे आराखडे त्यांनी मांडले. विरोधकांची मते कुठे कमी आहेत, त्यांची चाचपणी कुठे सुरु आहे. याची त्यांनी पाहणी करुन यादी तयार केली. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केले. दुपारी तीन वाजता राष्ट्रवादी पुरस्कृत संस्थापक पॅनेलचे तीन उमेवारांच्या विरोधात कोणाचे अर्ज आले नसल्याने त्यांची निवड बिनविरोध निवड झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात खरेदी-विक्री मतदारसंघ, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटी आणि कृषी प्रक्रिया मतदारसंघातून प्रत्येकी एक अर्ज दाखल झाला आहे. त्यामुळे खरेदी-विक्री मतदारसंघातून मकरंद पाटील, महाबळेश्वर विकास सेवा सोसायटीतून राजेंद्र राजपुरे आणि कृषिप्रक्रिया मतदारसंघातून शिवरूपराजे खर्डेकर हे बिनविरोध निवडून आले आहेत. याची माहिती मिळताच आमदार मकरंद पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आमदार मकरंद पाटील यांना उचलून घेत एकच वाघ, आमदार मकरंद पाटील अशा घोषणा देत जल्लोष केला. आता उर्वरित 18 संचालकांसाठी माघारी पर्यंत राजकीय हालचाली गतिमान होणार आहेत.
शिवरुपराजे उशिरा पोहोचले बँकेत
रामराजे नाईक निंबाळकर हे बँकेत राष्ट्रवादीचे पॅनेल कसे टाकायचे याचे गणित जुळवत चौथ्या मजल्यावर बसले असताना दुपारी सव्वा बाराच्या सुमारास शिवरुपराजे खर्डेकर हे गर्दीतून वाट काढत गेस्ट रुमपर्यंत पोहोचले. पोलिसांच्या गर्दीतून त्यांना पुढे जात येत नव्हते. काही पत्रकारांनी त्यांना पहाताच जावू द्या अशी विनंती केली. पालकमंत्र्यांच्या सुरक्षागार्डनी दरवाजा उघडला अन् आतमध्ये गेले. अर्ज दाखल करण्याच्यावेळी त्यांचा एकमेव अर्ज असल्याने बिनविरोध झाल्याचा आनंद मात्र फलटणकरांना चांगला झाला.
कोण कोण माघारी घेणार याकडे सातारकरांच्या नजरा
जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत हॉट ठरणार आहेत ते जावली सोसायटी, कराड सोसायटी, खटाव सोसायटी तसेच गृहनिर्माण या मतदार संघात चुरस लागली आहे. विद्यमान संचालकांसह अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे या मतदार संघातून कोण कोणाची मनधरणी करणार तर कोण बंडखोरी करणार याकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत 10 नोव्हेंबर अखेर असल्याने दिवाळीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.