काँग्रेसमधील अनेक नेत्यांना टिवटिव करता येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
ट्विटरने आठवडा उलटल्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे अकौंट पुन्हा सुरू केले आहे. त्यांच्यासोबत पक्षाच्या अन्य नेत्यांचे अकौंटही अनलॉक करण्यात आले आहे. त्यानंतर काँग्रेसच्या ऑफिशियल हँडलद्वारे ‘सत्यमेव जयते’ असा ट्विट करण्यात आला आहे. पक्षाचे सोशल मीडिया प्रभारी रोहन गुप्ता यांनी याला देशाच्या जनतेचा विजय ठरविले आहे.
यापूर्वी राहुल यांनी अकौंट ब्लॉक केल्याबद्दल शुक्रवारी नाराजी व्यक्त करणारा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडिओला ‘ट्विटरचा धोकादायक खेळ’ असे शीर्षक देण्यात आले होते. माझे ट्विटर अर्कौट बंद करून कंपनी राजकीय प्रक्रियेत हस्तक्षेप करत आहे. एक कंपनी आमच्या राजकारणाची व्याख्या देण्याचा व्यवसाय करत आहे. एक राजकारणी म्हणून मला हे मान्य नसल्याचे राहुल यांनी म्हटले होते.
हा देशाच्या लोकशाहीवरील हल्ला आहे. माझे 19 ते 20 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. माझे मत जाणून घेण्याचा या लोकांचा हक्क हिरावून घेतला जात आहे. ट्विटर एक तटस्थ व्यासपीठ असल्याची बाब कंपनी चुकीच ठरवत आहे. हे अत्यंत धोकादायक आहे. ट्विटर भेदभाव करणारा प्लॅटफॉर्म झाल्याचा दावा राहुल यांनी केला होता.
काँग्रेस नेत्यांचे अकौंट भारतीय कायदे आणि कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केल्यामुळे लॉक करण्यात आल्याचे ट्विटरने म्हटले होते. राहुल यांनी बलात्कार पीडित मुलीच्या पालकांचे छायाचित्र प्रसारित केले होते. ही कृती ज्युवेनाइल जस्टिस ऍक्ट आणि पॉक्सोचे उल्लंघन करणारी होती. पीडितेची ओळख उघड करू नये असे कायद्यात स्पष्टपणे म्हटले गेले आहे. राष्ट्रीय बालहक्क आयोगाने याप्रकरणी ट्विटरला नोटीस बजावली होती. त्यानंतरच ट्विटरने ही कारवाई केली होती.