नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काही दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी कॉंग्रेस नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरत संसद भवनाच्या परिसरात स्वतः ट्रॅक्टर चालवत आले होते. आज देखील राहुल गांधी यांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढलेली आहे. यावेळी राहुल गांधी सायकल चालवताना दिसले.
काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली १५ विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर सर्व खासदारांनी इंधन दरवाढीविरोधात सायकल रॅली काढली.यावेळी काँग्रेस नेत्यांनी दिल्लीतील मोदी सरकारवर टीका केली. देशभरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहेत.
पेगॅसस प्रकरणावरुन संसदेत गदारोळ घालत सरकारला जाब विचारणारे विरोधक एकवटले असून यावेळी पुढील रणनीती आखण्यात आली असं बोललं जात आहे. एकीकडे पेगॅसस प्रकरणामुळे गदारोळ सुरु असताना आसाम-मिझोराम सीमेवर रक्तरंजित संघर्षावरुनही विरोधक आक्रमक झाले आहेत.काँग्रेसने विरोधकांना एकत्र आणण्यासाठी पुढाकार घेत ब्रेकफास्ट मीटचं आयोजन केलं होतं.