नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी, ब्रेक फास्ट करण्यासाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांना बोलावलं होतं. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत हे राहुल गांधी यांच्याच बाजूला बसले होते. नाश्त्याच्या टेबलवरही राऊत आणि राहुल गांधी जवळजवळ होते. ही बैठक झाल्यानंतर राहुल गांधी हे संजय राऊत यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलत होते. हाच फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे काँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हाच फोटो अपलोड केल्याने या दोन्ही नेत्यांच्या मैत्रीसंबंधावर जोरदार चर्चा होत आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये काही तरी गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे असेच काहीसे चित्र दिसत आहे. याच फोटवर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांना राहुल गांधी यांच्या बाजूला बसल्यावरुन आणि खांद्यावर हात ठेवल्याच्या प्रकाराबद्दल माध्यमांनी प्रश्न केला. यावर संजय राऊत म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात हातात हात घालून काम करत आहोत. तो हात खांद्यावर आला इतकच झाल आहे. आमचे चांगले संबंध आहेत. एकत्र राज्य चालवताना, सरकार चालवताना फक्त पक्ष जवळ येऊन चालत नाही मनंही जवळ यावे लागतात, त्याच दृष्टीने पावलं पडत असतील तर त्याचे लोकं स्वागतच करतील असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच बाजूच्या खुर्चीवर बसल्यावरुन संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, शिवसेनेला नेहमीच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मानाचे स्थान दिलं जातं, राहुल गांधी यांच्याशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निरोप दिले गांधींना दिले आहेत. राहुल गांधी राज्य सरकारच्या कामाबाबत समाधानी आहेत.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. मंगळवारी त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. राहुल गांधी यांनी आपल्याकडून शिवसेनेची कार्यप्रणाली समजून घेतल्याचं ट्विट संजय राऊत यांनी केलं मंगळवारी केले होते.