बिम्समध्ये जिल्हाधिकाऱयांनी घेतली बैठक : कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी तयारी करण्याची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोविड चाचणीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे. याचबरोबर रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्व व्यवस्था आताच सज्ज ठेवावी. आपत्कालीन सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असून त्यादृष्टिने सर्व ती तयारी करण्यात यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी बिम्सचे अधिकारी आणि आरोग्याधिकाऱयांना केली आहे.
बिम्स रुग्णालयाला भेट देवून जिल्हाधिकाऱयांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. राज्यामध्ये झपाटय़ाने कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता रुग्णांवर पुन्हा उपचार करण्याचे कार्य आव्हानात्मक होणार आहे. त्यासाठी बेड तसेच ऑक्सीजन आणि रुग्णवाहिकाही सज्ज ठेवाव्यात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
कोविड रुग्णांची तपासणी वाढविणे गरजेचे
कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे तपासणीमध्ये वाढ होणे महत्त्वाचे आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. कोरोनाबाबत लक्षणे आढळल्यास तातडीने त्यावर उपचार सुरू करणे गरजेचे आहे, असेही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी सांगितले. कोविड लसीकरणाकडेही लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे. कोविडची लस देण्यासाठी जनजागृती करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी व्हेंटिलेटर आणि ऑक्सीजन अधिक प्रमाणात उपलब्ध करणे महत्त्वाचे आहे. यासाठी तयारी करा, अशी सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी यावेळी केली. बिम्सचे वैद्यकीय संचालक विनय दास्तीकोप यांच्यासह इतर डॉक्टर यावेळी उपस्थित होते.