ऑनलाईन टीम / पुणे :
रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. चाकणकर सध्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे महिला प्रदेशाध्यपद सोडल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीआधी चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला. त्यानंतर रिक्त असलेले महिला प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांना देण्यात आलं. दरम्यान, 4 फेब्रुवारी 2020 रोजी विजया रहाटकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून हे पद रिक्त होतं. राज्यात अत्याचाराच्या घटना वाढत असताना भाजपसह अन्य विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात होता. यावेळी सरकारने चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अधिकृत निवड केली. चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाची सुत्र हाती घेताच अनेक मोठी प्रकरणं हाताळली. त्यामुळे त्यांचे काम पाहता त्यांना या पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यांच्या राजीनाम्याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.